scorecardresearch

युक्रेनमधील युद्धात २२७ नागरिक ठार, ५२५ जखमी

युक्रेनी अधिकाऱ्यांनी मृत व जखमींचे आकडे यापेक्षा बरेच अधिक सांगितले आहेत.

जीनिव्हा : एका आठवडय़ापूर्वी सुरू झालेल्या रशियाच्या लष्करी आक्रमणात आतापर्यंत २२७ नागरिक ठार, तर ५२५ नागरिक जखमी झाले असल्याचे संयुक्त राष्ट्र मानवाधिकार कार्यालयाने म्हटले आहे.

यापूर्वी २०१४ साली रशिया समर्थक फुटीरतावादी आणि युक्रेनी फौजा यांच्यात पूर्व युक्रेनमध्ये झालेल्या लढाईत १३६ जण ठार, तर ५७७ जखमी झाले होते. त्यापेक्षा ताज्या युद्धातील नागरिकांची जीवहानी जास्त आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्तांच्या कार्यालयाने सांगितले.

आतापर्यंत कळलेले आकडे प्रत्यक्ष आकडय़ांपेक्षा बरेच कमी असावेत, असे या कार्यालयाने मान्य केले. मृतांच्या मोजणीसाठी हे कार्यालय काटेकोर पद्धत वापरते आणि केवळ शिक्कामोर्तब झालेल्या मृत्यूंचीच पुष्टी करते. युक्रेनी अधिकाऱ्यांनी मृत व जखमींचे आकडे यापेक्षा बरेच अधिक सांगितले आहेत.

‘विशेषत: सरकारच्या नियंत्रणाखालील क्षेत्रात आणि खासकरून अलीकडच्या दिवसांत, वास्तविक आकडे बरेच जास्त आहेत; कारण तुंबळ युद्ध सुरू असलेल्या भागांतून माहिती मिळण्यास उशीर झालेला आहे आणि काही वृत्तांना अद्याप दुजोरा मिळालेला नाही’, असे मानवाधिकार आयुक्त कार्यालयाने एका निवेदनात सांगितले.

बहुतांश मृत्यू तोफगोळय़ांचा मारा, मल्टी- लाँच अग्निबाण यंत्रणा आणि हवाई हल्ले यांसह स्फोटक शस्त्रांच्या वापरामुळे झालेले असल्याचेही या कार्यालयाचे म्हणणे आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 227 civilians killed 525 injured in ukraine since russian invasion un rights agency zws