उत्तर प्रदेशमध्ये अ‍ॅसिड हल्लाची एक खळबळजनक घटना समोर आली आहे. झाशीमधील बसार गावात पाणी भरण्यावरून झालेल्या वादातून गावातील एका गटाने दुसऱ्या गटातील लोकांवर अ‍ॅसिड हल्ला केला. या हल्ल्यामध्ये २३ गावकरी जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमींपैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर गावामध्ये तणाव असून या ठिकाणी पोलिसांचा मोठा फैजफाटा तैनात करण्यात आल्याचे आजतकने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

उल्दन क्षेत्रातील बसार गावात मंगळवारी रात्री नळावर पाणी भरण्यावरून दोन गटांमध्ये जोरदार भांडण झालं. या भांडणाचे रुपांतर हाणामारीत झालं. त्यानंतर एका गटाने गच्चीवरुन खाली उभ्या असलेल्या लोकांवर अ‍ॅसिड फेकले. त्यामध्ये २३ पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. या संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर गावात एकच धावपळ सुरू झाली.

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने जखमींना जवळच्या आरोग्य केंद्रावर उपचारासाठी दाखल कऱण्यात आला आहे. जखमींपैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांनी झाशीच्या मेडिकल रुग्णालयात हालवण्यात आलं आहे.

या प्रकरणामध्ये पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. आतापर्यंत सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सहा प्रमुख आरोपींपैकी चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून दोन फरार आरोपींचा शोध सुरु आहे.