बिर्याणीचे बरेच प्रकार आपण ऐकले आणि खाल्ले असतीलच. परंतु दुबई इथल्या एका रेस्टॉरंटने आपल्या ग्राहकांसाठी बिर्याणीचा एक अनोखा प्रकार सादर केला आहे तो म्हणजे २३ कॅरेट खाण्यायोग्य सोन्याने बनलेली गोल्ड बिर्याणी. सध्या या गोल्ड बिर्याणीचे फोटोज आणि खवय्यांनी त्याच्याबद्दल शेअर केलेल्या निरनिराळ्या पोस्ट्स इंटरनेटवर धुमाकुळ घालत आहेत.

या रॉयल गोल्ड बिर्याणीची किंमत १००० दिरहॅम म्हणजे १९,६९४ रूपये आहे. ही बिर्याणी बनवणाऱ्या द बॉम्बे बरो या रेस्टॉरंटने असा दावा केला आहे की ही बिर्याणी दुबईतील सर्वात महागडी बिर्याणी आहे.

बिर्याणी एका मोठ्या सोन्याच्या ताटात दिली जाते. यात तीन वेगवेगळ्या प्रकारच्या तांदूळ वापरले जातात. बिर्याणी तांदूळ, किमा राईस आणि पांढरा व केशरयुक्त तांदूळ ज्याचे वजन अंदाजे ३ किलोग्रॅम असते. ही बिर्याणी छोटे बटाटे, उकडलेली अंडी, पुदीना, भाजलेले काजू, डाळिंब आणि तळलेले कांदा हे घालून सजवले जातात.
यात वेगवेगळ्या प्रकारचे मांसही टाकले जाते. हे सर्व आपल्याला उत्कृष्ट सॉस, करी आणि रायता यासोबत वाढले जातात. नंतर हे ताट सोन्याच्या पानांनी सजवले जाते.