उत्तराखंडमध्ये जोरदार पावसाने हाहाकार माजला असून मंगळवारी राज्याच्या अनेक भागात पाऊस चालूच होता. पावसाने थैमान घातले असून राज्यात आणखी ११ बळी गेले  आहेत. कुमाऊँ भागात अनेक घरे पडली असून अनेक जण ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. गेल्या दोन दिवसांत राज्यात २३ जण मृत्युमुखी पडले असून ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

नैनीतालचा राज्याशी संपर्क तुटला असून ते लोकप्रिय पर्यटन क्षेत्र असल्याने लोकांची निराशा झाली. या ठिकाणाकडे जाणारे तीनही रस्ते बंद झाले आहेत. अनेक रस्त्यांवर दरडी कोसळल्या आहेत. भूस्खलन व ढगफुटीमुळे काही लोक मरण पावले असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

लष्कराची मदत

मुख्यमंत्री पुष्कर्रंसह धामी यांनी सांगितले की, सोमवारी पाच जण मरण पावले होते. लष्कराची तीन हेलिकॉप्टर्स राज्यात मदतीसाठी येत आहेत. त्यातील दोन नैनीताल जिल्ह्यात पाठवली जाणार आहेत. नैनीतालमध्ये ढगफुटीत अनेक ठिकाणी भूस्खलनही झाले असून अनेक लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. एक हेलिकॉप्टर गढवाल येथे मदतीसाठी पाठवण्यात येणार असून तेथे मंगळवारी ११ जण मरण पावले आहेत.

राज्य आपत्कालीन सेवा केंद्राने म्हटले आहे की, दोन ठिकाणी घरे कोसळून सात जण मरण पावले. तोटापाणी, क्वारव, या नैनीताल मधील भागात घरे कोसळली. एक जण उधर्मंसगनगरमधील बाजपूर येथे वाहून गेला. अल्मोरा जिल्ह्यात घर कोसळून ढिगाऱ्याखाली चार जण अडकल्याची घटना रापड खेड्यात घडली आहे. चमोली जिल्ह्यात जोशीमठ भागातही भूस्खलन झाले आहे. भिकियासेन येथे घर कोसळून काही जण अडकले आहेत. मुख्यमंत्र्यांनी हानीची हवाई पाहणी केली असून त्यांच्यासमवेत आपत्ती व्यवस्थापनमंत्री धर्नंसग रावत व पोलिस महासंचालक अशोक कुमार होते. जिल्हाधिकाऱ्यांना हानीचा अंदाज घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.