गेल्या आठवड्यात दिल्लीमध्ये एका भरधाव स्कॉर्पिओ गाडीने चिरडल्यामुळे २३ वर्षीय साहिल धनेशरा या तरुणाचा मृत्यू झाला होता. कथितपणे ही कार एक अल्पवयीन मुलगा चालवत होता. दरम्यान या प्रकरणात आता एक अत्यंत धक्कादायक बाब समोर आली आहे. साहिलच्या शवविच्छेदन अहवालातून त्याच्या शरीरावर झालेल्या गंभीर जखमांची माहिती मिळाली आहे. या रिपोर्टनुसार साहिलला डोक्याला झालेल्या गंभीर जखमेमुळे मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाला होता. या दुर्घटनेत त्याचा हात मोडला होता आणि त्याच्या बरगड्याही मोडलेल्या होत्या.

ही दुर्घटना ३ फेब्रुवारी रोजी लाल बहादूर शास्त्री कॉलेज रोजजवळ घडली होती. तर साहिल हा दिल्ली येथील द्वारकामधील रहिवासी होता.

साहिलची आई इन्ना माकन यांनी या दुर्घटनेतील गाडी चालवाऱ्या चालकाविरोधात कठोर कारवाईची मागणी करणारा एक हृदयद्रावक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. “मी माझा मुलगा साहिल धनेशरा गमावला आहे, एक २२ वर्षीय गुणी मुलगा ज्याला मी आई म्हणून एकटीने २३ वर्ष वाढवले होते. ज्याची स्कार्पिओ गाडीनेने अत्यंत निर्दयीपणे हत्या केली… गाडी चालवणाऱ्या चालकाकडे परवाना नव्हता आणि तो वेगाने गाडी चालवत असताना त्याची बहीण गाडीमध्ये बसून रील्स बनवत होती,” असा आरोप त्यांनी रविवारी एक्सवर पोस्ट केलेल्या व्हिडीओद्वारे केला आहे. पोलिसांनी या दाव्याचा तपास केला जात असल्याचे सांगितले आहे.

‘द इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, ३ फेब्रुवारी रोजी अपघातानंतर साहिलला बेशुद्ध अवस्थेत इंदिरा गांधी रुग्णालयात आणण्यात आले होते. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर दुपारी १ : ५४ वाजता त्याला मृत घोषित केले गेले.

दीन दयाल उपाध्याय रुग्णालयात करण्यात आलेल्या शवविच्छेदन अहवालात आढळून आले की, साहिलला अपघातामध्ये अनेक गंभीर जखमा झाल्या होत्या. त्याच्या पोटावर, डोक्यावर आणि इतर अवयवांवर कापल्याच्या आणि ओरखडल्याच्या जखमा होत्या, त्याचा एक हात मोडलेला होता, अनेक बरगड्या मोडल्या होत्या, त्याच्या लिव्हरला गंभीर इजा झाली होती आणि डोक्याला झालेल्या गंभीर जखमांमुळे त्याच्या मेंदूमध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. अनेक ठिकाणी झालेला रक्तस्त्राव आणि अपघातामुळे महत्त्वाच्या अवयवांना झालेली गंभीर इजा यामुळे साहिलचा मृत्यू झाला असे डॉक्टरांनी रिपोर्टमध्ये सांगितले आहे.

नेमकी घटना काय घडली?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११:५७ च्या सुमारास अपघाताबाबत पोलिसांना पीसीआर कॉल आला होता.

“घटनास्थळी पोहोचल्यावर, एक स्कॉर्पिओ, एक स्विफ्ट डिजायर टॅक्सी आणि एक मोटारसायकल यांचा अपघात झाल्याचे आढळून आले. दुचाकीस्वार जागीच मृत अवस्थेत आढळला, ज्याची ओळख नंतर साहिल म्हणून पटवण्यात आली,” अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.

पोलिसांनी सांगितले की स्कॉर्पिओ गाडीने विरुद्ध दिशेने येणाऱ्या मोटारसायकलला जोरात धडक दिली आणि त्यानंतर रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या स्विफ्ट डिजायर टॅक्सीलाही धडक दिली. या अपघातात जखमी झालेला टॅक्सी चालक अजित सिंग याला इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवला आहे.

स्कॉर्पिओ चालकाची ओळख पटली असून तो एक १७ वर्षीय मुलगा आहे. तसेच कथितपणे त्याच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना नसल्याचे आढळून आले होते आणि त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. तो एक अल्पवयीन असल्याने त्याला बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले आणि त्यानंतर त्याला निरीक्षण गृहात पाठवण्यात आले. त्यानंतर त्याला १० फेब्रुवारी रोजी दहावी बोर्डाची परीक्षा देण्यासाठी अंतरिम जामीन मिळाला असे पोलिसांनी सांगितले.

अपघातामधील तीनही वाहने जप्त करण्यात आली असून त्यांची मेकानिकली तपासणी, कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली आहे, तसेच सीसीटीव्ही फुटेज देखील गोळा करण्यात आले आहे.

तसेच सर्व वैद्यकीय आणि कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर साहिल याचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांना सोपवण्यात आली आहे.