Hindu man burnt alive in Bangladesh : बांगलादेशच्या नरसिंगडी येथून एक अत्यंत भयंकर घटना समोर आली आहे. येथे चंचल भौमिक नावाच्या एका २३ वर्षीय हिंदू तरुणाला तो दुकानात झोपलेला असताना जिवंत जाळण्यात आले आहे. ही घटना शुक्रवारी (२३ जानेवारी) रात्री घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी आधी दुकानाचे शटर बंद केले आणि नंतर पेट्रोल ओतून इमारतीला आग लावली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, चंचल याचा जळून मृत्यू होत नाही, तोपर्यंत हल्लेखोर बाहेरच थांबलेले होते आणि नंतर घटनास्थळावरून पळून गेले.

चंचल हा त्याच्या घरातील एकमेव कमवता व्यक्ती होता आणि वडिलांच्या निधनानंतर त्याच्यावर त्याची आजारी आई, अपंग असलेला मोठा भाऊ आणि एक लहान भाऊ या सर्वांची जबाबदारी होती. गेल्या सहा वर्षांपासून तो नरसिंगडी येथील एका स्थानिक गॅरेजमध्ये काम करत होता आणि तिथेच राहत होता.

स्थानिक आणि गॅरेजच्या मालकाने सांगितले की, चंचल हा एक साधा आणि प्रामाणिक तरूण होता ज्याचे कोणाबरोबरच वैर नव्हते. चंचलचे कुटुंब आणि शेजार्‍यांचा दावा आहे की ही हत्या पूर्वनियोजित आणि धार्मिक द्वेषातून झालेली असावी.

बांगलादेशमध्ये यापूर्वी घडलेल्या दिपू चंद्र दास आणि खोकोन चंद्र दास यांच्या हत्यांच्या घटनांमुळे देशभरातील हिंदू समुदायामध्ये भीतीचे सावट पसरले होते. चंचल भौमिकच्या हत्येमुळे बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक समुदायाच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

डिसेंबरच्या अखेरीस शरीयतपूर जिल्ह्यात ५० वर्षीय व्यावसायिक खोकोन दास यांच्यावर जमावाने हल्ला करून त्यांना पेटवून दिले होते. एक छोटे औषधांचे दुकान चालवणारे दास घरी परतत असताना त्यांच्यावर हल्ला झाला होता, त्यांना जबर मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर अंगावर पेट्रोल ओतून त्यांना जिवंत जाळण्यात आले होते.

तर त्याच्या आधी गारमेंट कामगार दिपू चंद्र दास याला देखील मरेपर्यंत मारहाण करण्यात आली आणि नंतर त्यानंतर नग्न करत पेटवून देण्यात आले होते. दरम्यान बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध तणावाचे बनले आहेत.