राम नाईकांच्या पुढाकाराने २४ जानेवारीचा मुहूर्त योगींनी निवडला

एवढे मोठे राज्य; पण स्वत:चा स्थापना दिवस नाही.. ही बाब उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जाणवली ती लखनौच्या राजभवनात साजऱ्या झालेल्या महाराष्ट्र दिन सोहळ्यात आणि ती त्यांच्या आवर्जून लक्षात आणून दिली ती उत्तर प्रदेशचे राज्यपाल असलेल्या राम नाईक यांनी.

.. मग काय? दुसऱ्याच दिवशी म्हणजे बुधवारी योगींनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला आणि उत्तर प्रदेशला २४ जानेवारी हा स्वत:चा दिन मिळाला. हा दिवस निवडण्याचे कारण म्हणजे २४ जानेवारी १९५० रोजी तत्कालीन संयुक्त प्रांताचे (युनायटेड प्रॉव्हिन्स) नामांतर उत्तर प्रदेश असे केले होते.

एखाद्या राजभवनात दुसऱ्या राज्याचा दिवस साजरा होण्याचा योग तसा विरळाच. पण मराठी संस्कृतीवर अपार प्रेम असणाऱ्या राम नाईक यांनी तो लखनौच्या भव्य राजनिवासामध्ये १ मे रोजी जुळवून आणला. त्यासाठी योगींना विशेष अतिथी म्हणून बोलाविले. ते आले आणि जय महाराष्ट्र या शब्दांनी अभिवादन करतच भाषण सुरू केले. त्यानंतर सुरुवातीची काही वाक्येही ते मराठीतूनच बोलले.

पण त्याच वेळी उत्तर प्रदेशात महाराष्ट्र दिन साजरा होत असताना उत्तर प्रदेशला स्वत:चा दिन नसल्याची जाणीव नाईक यांनी करून दिली, योगींना ते मनापासून पटले आणि दुसऱ्याच दिवशी तसा निर्णयही त्यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेऊनही टाकला..

खरे तर नाईक यांनी मागील सरकारलाच उत्तर प्रदेश दिनाची सूचना केली होती. पण अखिलेशांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते.

सांगलीच्या भाजप खासदारांना आमंत्रण

लखनौ राज भवनातील या महाराष्ट्र दिनाच्या सोहळ्याला भाजपचे सांगलीचे खासदार संजयकाका पाटील यांना खास निमंत्रण देण्यात आले होते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी निकटचे संबंध असल्याने संजयकाकांना आवर्जून बोलाविल्याचे समजते. मुख्यमंत्री होण्यापूर्वी योगी हे संजयकाकांच्या सांगली मतदारसंघामध्ये येऊन गेले होते.