scorecardresearch

धक्कादायक, बिहारमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २४ जणांचा मृत्यू झाल्याचा संशय

बिहारमधील २ जिल्ह्यांमध्ये विषारी बनावट दारू प्यायल्यानं तब्बल २४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. गोपालगंज आणि पश्चिम चंपारण्य या दोन जिल्ह्यात या घटना घडल्या.

धक्कादायक, बिहारमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २४ जणांचा मृत्यू झाल्याचा संशय
(प्रातिनिधिक छायाचित्र)

बिहारमधील २ जिल्ह्यांमध्ये विषारी दारू प्यायल्यानं तब्बल २४ नागरिकांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. गोपालगंज आणि पश्चिम चंपारण्य या दोन जिल्ह्यात या घटना घडल्या. गुरूवारी (४ नोव्हेंबर) चंपारण्य जिल्ह्यातील तेलहुआ गावात विषारी दारू पिल्यानं ८ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर गोपालगंजमध्ये देखील विषारी दारू प्यायल्यानं मृत्यू झालेल्यांची संख्या १६ वर पोहचली. असं असलं तरी जिल्हा प्रशासनाने या मृत्यूंच्या कारणांची अधिकृत माहिती दिलेली नाही.

मागील १० दिवसात उत्तर बिहारमधील विषारी दारूमुळे मृत्यूची तिसरी घटना

बिहारमध्ये विषारी दारूवर कारवाई करण्यात प्रशासन सपशेल अपयशी ठरल्याचं वारंवार समोर आलंय. उत्तर बिहारमध्ये मागील १० दिवसात विषारी दारूमुळे नागरिकांच्या मृत्यूची ही तिसरी घटना आहे. या घटनेनंतर बिहारचे मंत्री जनरराम हे तातडीने गोपालगंजला पोहचले. यानंतर त्यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितलं, “विषारी दारू प्यायल्यानं मृत्यू झाल्याचा संशय असलेल्या पीडित व्यक्तींच्या कुटुंबांना मी भेट दिली आहे. हे सर्व एनडीए सरकारला बदनाम करण्याचं षडयंत्रह असू शकतं.”

तपासासाठी ३ पथकांची नेमणूक

गोपालगंजचे पोलीस अधीक्षक आनंद कुमार यांनी या घटनेची माहिती देताना सांगितलं, “गोपालगंज जिल्ह्यातील मोहम्मदपूर गावात मागील २ दिवसात संशयास्पदपणे काही लोकांचा मृत्यू झालाय. अद्याप शवविच्छेदन झालेलं नसल्यानं मृत्यूचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. ३ पथकं या प्रकरणांचा तपास करत आहे.” स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काही पीडित कुटुंबांनी काही मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत.

हेही वाचा : “पुजाऱ्यानं आधी दारू आणायला सांगितली, मग खोलीत बंद करून…”

प्राथमिकदृष्ट्या हे सर्व मृत्यू विषारी दारू प्यायल्यानं झाल्याचा संशय प्रशासनाने व्यक्त केलाय. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मंगळवार आणि बुधवारच्या दरम्यान झालेल्या घटनांप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ४ जणांना अटक केलीय. स्थानिक दारू ठेकेदारांकडे विषारी दारू पिणाऱ्यांमध्ये अनुसुचित जातीतील २० जणांचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या