24 year old Indian woman goes missing after lands in US : एक भारतीय महिला अरेंज मॅरेजसाठी अमेरिकेत आली आणि ती अचानक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. २४ वर्षीय भारतीय महिला, सिमरन सिमरन, अमेरिकेत पोहचल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच बेपत्ता झाली आहे. द न्यू यॉर्क पोस्ट (NYP) ने न्यू जर्सी प्रशासकीय अधिकार्यांच्या हवाल्याने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
कॅमडेन काउंटीतील लिंडेनवोल्ड पोलिसांनी सांगितले की सिमरन ही २० जून रोजी अमेरिकेत उतरली आणि ती २६ जून रोजी ती बेपत्ता असल्याचे नोंदवण्यात आले.
ती पोहचली तेव्हा ती सीसीटीव्ही फुटेजमध्ये तिच्या फोनमध्ये पाहाताना आढळून आली होती आणि फुटेजनुसार ती कोणाचीतरी वाट पाहत असल्याचे दिसून आले. तसेच अधिकाऱ्यांनी असेही स्पष्ट केले के ती कोणत्याही अडचणीत किंवा त्रासात असल्याचे दिसून येत नव्हते, असेही न्यू यॉर्क पोस्टने म्हटले आहे.
रिपोर्टनुसार, या महिलेची उंची ५ फूट ४ इंच असून, तिचे वजन ६८ किलो ग्रॅम आहे, तर तिच्या कपाळावर डाव्या बाजूला एक लहान जखमेचा व्रण आहे. तिला अखेरचे पाहिले गेले तेव्हा तिने ग्रे रंगाची स्वेटपँट आणि पांढरा टी-शर्ट, काळे फ्लिप-फ्लॉप्स आणि हिऱ्यांनी जडवलेले कानातले घातलेले होते.
कोणी ओळखीचं नाही, इंग्रजीही येत नाही
सिमरनला इंग्रजी भाषा बोलता येत नाही, इतकेच नाही तर तिचे कोणी नातेवाईक देखील अमेरिकेत नाहीत. सिमरन हिच्याकडे एक इंटरनॅशनल फोन आहे जो फक्त वाय-फायवर चालतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंग्रजीमध्ये संवाद साधू न शकणे आणि स्थानिक कोणी ओळखीचे नसल्याने तिचा शोध घेणे कठीण होऊन बसले आहे.
सध्या ज्यांच्याशी संपर्क साधून तिचा संभाव्य ठावठिकाणा जाणून घेता येईल असे तिच्या भारातील कुटुंबातील कोणीही नाही, असेही Patch आणि न्यू यॉर्क पोस्टने लिंडेनवोल्ट पोलीस विभागाच्या हवाल्याने म्हटले आहे.
दरम्यान या प्रकरणाच तपास करत असलेल्या अधिकार्यांनी सांगितले की, ती अरेंज मॅरेजसाठी अमेरिकेत आली होती, मात्र असे असले तरी सध्या तपास करणारे अधिकारी हे या महिलेचा लग्न करण्याचा कोणताही उद्देश नसावा आणि तिने लग्नाच्या प्रस्तावाचा वापर फक्त देशात प्रवेश करण्यासाठी केला असण्याच्या शक्यतेवर देखील विचार करत आहेत, असे वृत्त न्यू यॉर्क पोस्टने दिले आहे.