HIV Injection Case Woman Suicide: लग्नाला नकार दिला म्हणून एका माथेफिरूने महिलेला एचआयव्ही-पॉझिटिव्ह असलेल्या रक्ताचे इंजेक्शन दिले. या घटनेमुळे २४ वर्षीय महिलेला जबर मानसिक धक्का बसला. या धक्क्यातून महिलेने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला. ११ मार्च रोजी हैदराबाद येथे सदर घटना घडली होती. आरोपी मनोहरला मृत महिलेने लग्नासाठी नकार देताच, त्याने एचआयव्ही-पॉझिटिव्ह असलेल्या रक्ताचे इंजेक्शन दिले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि मृत महिला हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. महिलेच्या नातेवाईकांनी तिचे लग्न आरोपीबरोबर ठरवले होते.
आरोपीच्या आई-वडिलांना आधीच एचआयव्हीची लागण झालेली आहे. त्यामुळे महिलेच्या पालकांनी आरोपीची सप्टेंबर २०२५ मध्ये चाचणी करून घेतली. या चाचणीत आरोपीही पॉझिटिव्ह आढळला होता. यानंतर महिलेने सदर लग्न तात्काळ रद्द केले. यानंतर संतापलेल्या आरोपीने महिलेला इंजेक्शन टोचले.
या घटनेनंतर आरोपीला अटक करण्यात आली होती. महिन्याभरानंतर आता शुक्रवारी (१० एप्रिल) महिलेने गळफास घेऊन जीवन संपवले. मुलगी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्यानंतर आई-वडिलांनी तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने इंजेक्शन दिल्यापासून महिला मानसिक तणावाखाली होती. पोलिसांनी सांगितले की, एचआयव्हीचे इंजेक्शन दिल्यापासून महिला सामाजिक कलंक लागण्याची भीती आणि भावनिक आघाताशी झगडत होती. तरीही या प्रकरणाचा सर्वांगीन तपास केला जात आहे, असे पोचारम आयटी कॉरिडॉरचे पोलीस निरीक्षक म्हणाले.
माजी प्रियकराच्या पत्नीला HIV चे इंजेक्शन दिलं
आंध्रप्रदेशमध्ये अशाच प्रकारची एक घटना जानेवारी २०२६ मध्ये घडली होती. कुर्नूल शहरात एका महिलेने तिच्या माजी प्रियकराच्या पत्नीला जबरदस्तीने एचआयव्हीचे इंजेक्शन देऊन तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला. कुर्नूलचे पोलीस उपायुक्त बाबू प्रसाद यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, मुख्य आरोपी वसुंधराचे पूर्वी एका डॉक्टरबरोबर प्रेमसंबंध होते. त्याचे लग्न झाल्यानंतर तो तिच्यापासून दुरावला. यानंतर आरोपी महिलेने त्याच्या पत्नीबद्दल राग डोक्यात धरून अशाप्रकारे सूड उगवला.
