चोरी झाल्यास माणूस पोलिसांकडे तक्रार घेऊन जातो. पण इथं तर चक्क पोलीस स्टेशनमध्येच चोरी झाल्याचं प्रकरण समोर आलंय. उत्तर प्रदेशच्या आग्रामध्ये पोलीस ठाण्यातून थोडीथोडकी नव्हे तर २५ लाख रुपयांची रोकड चोरीला गेली आहे. याप्रकरणी स्टेशन प्रभारीसह पाच पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. चोरी झाल्यानंतर जप्त केलेली रक्कम पोलीस ठाण्यात ठेवण्यात आली होती. तीच रक्कम मालकाकडे सुपूर्त करण्यापूर्वीच चोरी झाली आहे.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आग्राचे अतिरिक्त महासंचालक (एडीजी) राजीव कृष्णा यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी विकास कॉलनी, आग्रा येथील रहिवासी रेल्वे ठेकेदार प्रेमचंद यांच्या घरातून सात सोन्याची बिस्किटे आणि रोख रक्कम चोरीला गेली होती. या प्रकरणी १३ ऑक्टोबर रोजी पोलिसांनी चोरीच्या आरोपावरून प्रेम चंदचा दूरचा नातेवाईक आणि जसवंत नगर इटावा येथे राहणाऱ्या रोहितला अटक केली. त्याच्याकडून २४ लाख रुपये रोख आणि पाच सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली. ही रोकड जगदीशपुरा पोलीस ठाण्याच्या मालखान्यात ठेवण्यात आली होती. जप्त केलेल्या २४ लाख रुपयांसह पोलीस ठाण्याच्या मालखान्यात आधीच ठेवलेली १ लाख रुपयांची रोकडही चोरट्यांनी चोरून नेली आहे.


राजीव कृष्णा यांनी जगदीशपुरा पोलीस ठाण्याच्या मालखान्यातून २५ लाख रुपये रोख चोरी गेल्या प्रकरणी निष्काळजी केल्यामुळे पोलीस स्टेशनचे प्रभारी अनूप कुमार तिवारी, उपनिरीक्षक राम निवास तसेच रात्री कर्तव्यावर असलेल्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधीक्षक मुनीराज यांना चोरट्याला अटक करून २५ लाख रुपये लवकरात लवकर जप्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 25 lakh rupees stolen from police station in agra hrc
First published on: 18-10-2021 at 12:49 IST