देशात करोनाच्या रुग्णसंख्येत घट होत असताना ओमायक्रॉनने चिंता वाढवली आहे. आतापर्यंत देशात ओमायक्रॉनचे चार रुग्ण आढळले आहे. ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी सरकारने नवीन नियमावली जारी केली आहे. यातच १४ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर दरम्यान देशात सुमारे २५ लाख लग्न होत आहेत. यामध्ये एकट्या दिल्लीत सुमारे दीड लाख लग्न होत आहेत. किरकोळ व्यापाऱ्यांची संघटना असलेल्या कॅटने हा अंदाज व्यक्त केला आहे. या लग्न समारंभांमुळे ओमायक्रॉनचा धोका वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

रुग्णसंख्येत घट आणि निर्बंधांमध्ये शिथिलता दिल्याने आजकाल विवाहसोहळ्यांमध्ये करोना नियमांचं पालन होताना दिसून येत नाही. मास्क न लावता लोक मोकळेपणाने फिरत आहेत. पोलीस आणि प्रशासन देखील फारसे लक्ष देताना दिसून येत नाही. यातच गेस्ट हाऊस किंवा लग्न समारंभाच्या इतर ठिकाणी करोना नियमांचे पालन केले जात नसल्याचे आरोग्य तज्ज्ञांनी म्हटले आहे. ओमायक्रॉनच्या वाढत्या धोक्यात ही एक मोठी समस्या बनू शकते, अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात एनडीटीव्हीने वृत्त दिलंय.

ओमायक्रॉनचा धोका वाढत असला तरी सध्या गर्दीबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत संसर्ग पसरण्याचा धोका असतो. दिल्ली-एनसीआरसह देशातील बहुतांश भागात कोरोनाची प्रकरणे खूपच कमी असली तरी, अतिसंसर्गजन्य ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेता कोणताही धोका पत्करणे फायद्याचे ठरणार नाही. एम्सचे माजी संचालक एमसी मिश्रा म्हणाले की, “सणांनंतर लग्नाचा हा हंगाम आर्थिक आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून चांगला आहे, त्यावर बंदी घालता येणार नाही. परंतु करोना संदर्भातील नियम पाळण्यात कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा करू नये.”

या विवाहसोहळ्यांमध्ये परदेशातून येणारे अनेक लोकही सहभागी होण्याची शक्यता आहे, अशा परिस्थितीत ओमायक्रॉनबाबत कोणताही निष्काळजीपणा घातक ठरू शकतो. प्रशासकीय आणि आरोग्य यंत्रणांनी केवळ विमानतळांवर येणाऱ्या लोकांची तपासणी करू नये. त्याऐवजी, देशातही करोनाच्या नियमांचे योग्य प्रकारे पालन करण्यासाठी थोडे कठोर निर्णय घ्यावे लागतील, असं मिश्र म्हणाले.

कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बीसी भरतिया आणि राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल म्हणाले की, “१४ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या एका महिन्यात देशभरात २५ लाख आणि दिल्लीत सुमारे दीड लाख विवाह सोहळ्यांचा अंदाज आहे. यामध्ये ३ लाख कोटी रुपयांहून अधिकचा व्यवसाय होऊ शकतो.”