पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. देशाचे पंतप्रधान होण्यापूर्वी नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. आपल्या राजकीय प्रवासाबाबत त्यांनी लोकांचे आभार मानले आहेत. तसंच त्यांनी आपल्या खास शैलीत सगळ्या जनतेला नमन केलं आहे. दिल्लीत विकसित भारत संकल्प कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनोगत व्यक्त केलं.
काय म्हणाले नरेंद्र मोदी?
आज मी आपल्या सगळ्यांचे आभार मानायला या ठिकाणी उभा आहे. ७ ऑक्टोबर २००१ रोजी मी गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती तेव्हा वाटलंही नव्हतं की माझ्या आयुष्यात हे वळणही येईल. आज मला राजकीय नेतृत्व म्हणून काम करताना २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. जनतेने कायमस्वरूपी दिलेल्या आशीर्वादाचा हा परिणाम आहे. भारतीय जनता पार्टी, एनडीए, लोकशाहीवर विश्वास असलेले सगळे राजकारणी या सगळ्यांचे मी आज आभार मानतो. असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. तसंच देशाच्या जनतेपुढे मी आज नतमस्तक आहे असंही नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
मला कायमच जनतेने त्यांचा सेवेकरी म्हणून निवडलं-मोदी
नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, या २५ वर्षात जितक्या निवडणुका झाल्या मग त्या विधानसभेच्या असोत किंवा लोकसभेच्या जनेतने कायमच सेवेकरी म्हणून मला निवडलं. मी आज भारतीय लोकशाहीला, भारतीय संविधानाला वंदन करतो. सेवाज्योत यात्रेत भाग घेणाऱ्या सगळ्या नागरिकांचे मी आभार मानतो. मी आज पहाटे विनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. मी देशासाठी प्रार्थना केली. १४० कोटी भारतीयांसाठी मी प्रार्थना केली आणि स्वतःसाठी प्रार्थना केली. ही प्रार्थना अशीच होती की देवाने मला एवढी शक्ती आणि सामर्थ्य देवो की मी आपल्या देशासाठी आणखी उर्जेने काम करू शकेन. देशाची दिवसरात्र सेवा करू शकेन यासाठी मला उर्जा प्रदान करा असं मागणं मी देवाकडे मागितलं. आज मी जो काही आहे त्यात सर्वात मोठा वाटा जनता जनार्दनाचा आहे. माझ्यासाठी जनताही ईश्वरच आहे. कोट्यवधी देशवासीयांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि लाखो कार्यकर्त्यांचे परिश्रम ही माझी शक्ती आहे. या देशाने मला खूप काही दिलं आहे. त्यामुळे या देशासाठी माझी जबाबदारी सर्वाधिक आहे. मी मनापासून हे मानतो की देशातील प्रत्येक नागरिकाचा माझ्यावर सर्वाधिक जास्त हक्क आहे. २५ वर्षांचा लोकांनी दाखवलेला विश्वास, हा २५ वर्षांचा अनुभव माझ्यासाठी खूप मोठं गाठोडं आहे. शिवाय हे गाठोडं माझ्या एकट्याचं नाही तर संपूर्ण देशाचं आहे.
मी देवाकडे एकच मागणं मागितलं की माझी शिकण्याची शक्ती कमी होऊ देऊ नकोस-मोदी
मला आठवतं मी जेव्हा शाळेत शिकत होतो, तेव्हा आमचे शिक्षक विविध प्रकारचे धडे आम्हाला शिकवत असत. वर्गात सर्वात आधी पोहचणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मी असायचो. काहीतरी शिकायचं आहे ही सवय मला तेव्हापासून आहे. ती सवय माझ्या आयुष्याचा भाग झाली आहे. मी आजही स्वतःला एक विद्यार्थी मानतो आहे. प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करतो. आज मंदिरात मी माझ्यासाठीही एक प्रार्थना केली. मी देवाला हे सांगितलं की माझी शिकण्याची शक्ती कमी होऊ देऊ नकोस. मी जेवढं शिकेन तेवढं देशासाठी काहीतरी करण्याचं सामर्थ्य वाढेल. आज मी जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा माझ्या मनात कृतज्ञतेचे भाव उत्पन्न होतात. मी कृतज्ञ आहे प्रत्येक व्यक्तीसाठी आणि त्या प्रत्येक घटनेसाठी ज्यांनी मला काही तरी शिकवलं आहे. ज्यांनी मला जिंकून दिलं त्यांनी मला विनम्र होण्यास शिकवलं. ज्यांनी मला हरवलं त्यांनी मला पुन्हा उभं राहायला शिकवलं. हितचिंतकांनी मला प्रोत्साहन दिलं आणि टीकाकरांनी मला आत्मपरीक्षण करायला शिकवला. जे माझ्या साथीला आले त्यांनी मला विश्वासाची शक्ती काय ते दाखवून दिलं. ज्यांनी माझा विरोध दर्शवला त्यांनी मला लोकशाहीची शक्ती समजवून दिली. प्रत्येक संकटाने माझ्या धैर्याची परीक्षा पाहिली आहे. तर प्रत्येक यशाने माझ्या जबाबदारीचा विस्तार वाढवला असंही मोदी यांनी म्हटलं आहे.
