इस्रायल आणि अमेरिका यांनी संयुक्त कारवाई करत इराणवर हल्ला केला. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांचा मृत्यू झाला. आम्ही पुढचे चाळीस दिवस युद्धासाठी तयार आहोत असं अमेरिका आणि इस्रायलने म्हटलं आहे. इराणकडून प्रत्युत्तर देण्यात येतं आहे. दरम्यान या हल्ल्यात तीन भारतीयांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी एकाचं नाव समोर आलं आहे. दीक्षित सोळंकी या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ओमानच्या किनारपट्टीवर झालेल्या ड्रोन हल्ल्यात हा तरुण मारला गेला.

दीक्षित सोळंकी मुंबईत स्थायिक झाला होता

दीक्षित सोळंकी हा तरुण मूळचा दीव येथील होता. पण तो काही काळापूर्वी मुंबईत स्थायिक झाला होता. मुंबईतल्या कांदिवली या भागात तो वास्तव्यास होता. ओमान येथील मस्कत किनारपट्टीपासून ५२ नॉटिकल माईल्सवर असलेल्या MKD Vyom या ऑईल व्हेसलवर स्फोटकांनी भरलेल्या ड्रोनने धडक दिली. या भीषण स्फोटात इंजिन रुमला आग लागली. याच घटनेत दीक्षित सोळंकीचा मृत्यू झाला. या घटनेत बिहार आणि राजस्थान येथील दोन जणही मारले गेले. दीक्षित सोळंकी हा दीवचे मच्छिमार व्यावसायिक अमृतलाल सोळंकी यांचा धाकटा मुलगा होता. महिन्याभरापूर्वी त्याच्या आईचं निधन झालं ज्यानंतर तो गावी आला होता आणि मग तो पुन्हा ओमानला गेला होता.

मुंबईत बुधवारपर्यंत येणार दीक्षितचा मृतदेह

ओमानमधील भारतीय दूतावासाने दीक्षित सोळंकीच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. टँकरवरील इतर २५ क्रू मेंबर्सची (ज्यात १६ भारतीय होते) सुखरूप सुटका करण्यात आली आहे. दीक्षित सोळंकीची मोठी बहीण दुबईमध्ये राहते. महिन्याभरापूर्वी या दोघांची भेट झाली होती. एक महिन्यापूर्वी दीक्षितच्या आईचा मृत्यू झाल्याने तो दीवला आला होता. आता इराण, इस्रायल युद्धात हा तरुण मारला गेला आहे. दीक्षित सोळंकीचा मृतदेह बुधवार पर्यंत मुंबईत पोहचेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे. होमुर्झ या ठिकाणीही अशाच प्रकारे एका ऑईल टँकरवर हल्ला झाला. ज्यामध्ये चार क्रू मेंबर्स जखमी झाले. या चारजणांमध्ये भारतीय आणि इराणी नागरिक होते. ज्या ऑईल व्हेसलवर दीक्षित सोळंकी काम करत होता त्यावर एकूण २५ क्रू मेंबर कार्यरत होते. ज्यामध्ये १६ भारतीय आणि चार बांगलादेशी नागरिकांचा समावेश होता. मस्कत या ठिकाणी असलेल्या पोर्ट सुलतान कुबासमधे हे व्हेसल होतं.