अफगाणिस्तानातील अनेक भागांना भूकंपाचा जोरदार धक्का बसला आहे. या भूकंपात २५५ लोकांचा मृत्यू झाला असून १५० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. सुरक्षा दलांकडून बचाव कार्य राबवण्यात येत आहे. भुकंपाचा धक्का एवढा तीव्र होता की अफगाणिस्तान सोबत पाकिस्तान आणि भारतातील काही भागांनाही हा धक्का जाणवल्याचे सांगण्यात येत आहे.

६.१ रिश्टर स्केलचा धक्का

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ६.१ रिश्टर स्केलच्या या भूकंपामुळे अफगाणिस्तानसोबत पाकिस्तानलाही भुकंपाचे धक्के जाणवले आहेत. अफगाणिस्तान सरकारचे प्रवक्ते बिलाल करीमी यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली. तसेच भुकंपाचे धक्के जाणवलेल्या भागात मदतीसाठी आपातकालीन संस्थांना आवाहनही करण्यात आले आहे. दक्षिणपूर्व अफगाणिस्तानच्या खोत शहरापासून ४४ किलोमीटर दूर या भुकंपाचा केंद्रबिदू असल्याची माहिती यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने दिली आहे.

पाकिस्तान आणि भारतालाही धक्का

या भुकंपाचा प्रभाव ५०० किमीच्या परिघात होता त्यामुळे अफगाणिस्तानसोबत पाकिस्तान आणि भारतालाही भुकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती युरोपीयन भूमध्य भूकंप विज्ञान केंद्राने दिली. पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, इस्लामाबाद, पेशावर, रावळपिंडी आणि मुलतान शहरांनाही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत.अफगाणिस्तानमधील बर्मल, झिरुक, नाका आणि ग्यान जिल्ह्यांना भुकंपाचा जोरदार धक्का बसला आहे. या भागातील मृतांची संख्या २५५ वर पोहचली असून १५५ पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. मातीच्या ढिगाऱ्याखालून मृतदेह बाहेर काढण्यात येत असून हॅलिकॉप्टरच्या माध्यमातून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.