26/11 Mumbai Attack Hafiz Saeed Trial: “दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी आणि दहशतवाद्यांना कठोर शिक्षा मिळावी यासाठी भारत आवश्यक ती सर्व पावले उचलत राहील”, अशी भूमिका परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी मांडली. मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील पाकिस्तानात पळून गेलेल्या आरोपींवर अनुपस्थितीत खटला चालवण्याची प्रक्रिया मुंबई पोलिसांनी सुरू केली आहे. यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने ही प्रतिक्रिया दिली. लष्कर-ए-तोयबाचा सूत्रधार हाफिज सईद आणि झकी-उर-रहमान लखवी याच्यासह सहा आरोपींचा यात समावेश आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केली भूमिका

परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जयस्वाल यांनी २००८ च्या मुंबई हल्ल्यातील फरार आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्याच्या निर्णयावर भाष्य केले. जगाने दहशतवादी कारवायांचे गांभीर्य समजून घ्यावे, अशी भारताची अपेक्षा असल्याचे जयस्वाल म्हणाले.

“हे विषय अत्यंत गंभीर आहेत आणि आम्ही याकडे अत्यंत गांभीर्याने पाहत आहोत. यामागची भीषणता जगाने समजून घ्यावी, अशी आमची इच्छा आहे. भारताला दहशतवादाचा मोठा फटका बसला आहे. सीमापार दहशतवादासह संपूर्ण दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांत आम्ही अनेक प्रयत्न केले आहेत. आमचा हा लढा भविष्यातही सुरू राहील. दहशतवादाचा पराभव करण्यासाठी आवश्यक पावले सातत्याने उचलत राहू,” असे जयस्वाल म्हणाले.

हाफिज सईदसह सहा जणांविरोधात खटला

मुंबई पोलिसांनी सोमवारी २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील ६ पाकिस्तानींवर अनुपस्थितीत खटला चालवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक हाफिज सईद आणि वरिष्ठ कमांडर जकी-उर-रहमान लखवी याचा समावेश आहे. मुंबई पोलिसांनी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना पत्र लिहून फरार आरोपींविरुद्ध कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यास सांगितले आहे. हाफिज सईद, झकी-उर-रहमान लखवी, साजिद मीर, अबू अलकामा, असीम ऊर्फ अबू कहाफा आणि मेजर अब्दुर रहमान पाशा यांच्या विरोधात ही कायदेशीर घोषणा करण्यात आली आहे.

शाहद भट्टी दहशतवादी जाळे उद्ध्वस्त

विशेष म्हणजे, अशा स्वरूपाच्या दहशतवादी खटल्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील अनुपस्थितीत खटला चालवण्याच्या तरतुदींचा वापर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. पाकिस्तानने शाहद भट्टी दहशतवादी नेटवर्कचा आयएसआय सोबतचा संबंध फेटाळून लावल्याबद्दल परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र शब्दांत आक्षेप घेतला. दरम्यान, स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर भारताने १४ राज्यांमध्ये संयुक्त कारवाया करत आयएसआयच्या पाठिंब्याने चालवले जाणारे शाहद भट्टी दहशतवादी जाळे उद्ध्वस्त केले होते आणि देशविघातक हल्ल्यांचे त्यांचे कट उधळून लावले होते. या सुरक्षा मोहिमेदरम्यान सीमापार दहशतवादाविरुद्धच्या भारताच्या झिरो टॉलरन्स धोरणांतर्गत २५३ जणांना ताब्यात घेण्यात आले, ८० हून अधिक एफआयआर नोंदवण्यात आले आणि २०० हून अधिक ऑपरेटरना अटक करण्यात आली.