मुंबई २६/११ हल्ल्यातील आरोपी तहव्वूर हूसैन राणाचं लवकरच भारतात प्रत्यार्पण होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात नुकताच भारत आणि अमेरिका यांच्यात बैठक पार पडल्याची माहिती आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटी अमेरिका त्याला भारताच्या स्वाधीन करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी अमेरिकेच्या न्यायालयानेही तहव्वूर राणाच्या भारतातील प्रत्यार्पणाला हिरवा कंदील दिला आहे.
इंडियन एक्सप्रेसने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, काही दिवसांपूर्वीच नवी दिल्लीतील अमेरिकी दुतावासात भारत आणि अमेरिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाचा मुद्दा केंद्रस्थानी होता. यावेळी तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणासाठी भारत सरकारला करावी लागणारी तयारी तसेच भारतात दाखल झाल्यानंतर त्याला ज्या तुरुंगात ठेवण्यात येईल, तेथील सुरक्षा व्यवस्था याबाबत सविस्तर चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे.
तहव्वूर राणा सध्या लॉस एंजल्स येथे तुरूंगात आहे. मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी आणि लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी डेविड हेडलीची मदत केल्याचा आरोप राणावर आहे. यापूर्वी अमेरिकेच्या न्यायालयाने त्याच्या भारतातील प्रत्यार्पणाला मंजूरी दिली आहे. तहव्वूर राणाला भारताच्या स्वाधीन करता येऊ शकते, भारताने त्यासाठी योग्य ते पुरावे दिले आहेत, असं अमेरिकेच्या न्यायालयाने म्हटलं आहे.
राणाचा जन्म आणि शिक्षण पाकिस्तानात झाले. त्याने थोड्या काळासाठी पाकिस्तानी सैन्यात डॉक्टर म्हणून सेवा दिल्यानंतर, १९९७ मध्ये तो कॅनडाला गेला. तो इमिग्रेशन सेवांमध्ये विशेषज्ञ म्हणून कार्यरत झाला आणि अखेरीस त्याने कॅनडाचे नागरिकत्व मिळवले. २००९ साली डॅनिश वृत्तपत्राने प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दलचे एक चित्र छापल्यानंतर वृत्तपत्राचे कार्यलय बॉम्बने उडवून देण्याची योजना राणाने आखली होती. याप्रकरणात शिकागोच्या न्यायालयाने त्याला दोषी ठरविले होते. शिकागोच्या न्यायालयाने त्याच्यावर तीन गुन्हे दाखल केले होते, तसेच मुंबईवरील हल्ल्याचा कट रचल्याचाही आरोप केला होता. त्यानंतर भारताकडून त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी केली जात होती.
२०११ मध्ये एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रात राणासह नऊ जणांच्या नावाचा उल्लेख होता. त्यांच्या मुंबई हल्ल्याच्या नियोजनात सहभाग असल्याचे या आरोपपत्रात सांगण्यात आले होते.