मुंबईवरील २६/११च्या हल्ल्यामागील खऱया दोषींना शिक्षा ठोठावण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले असल्याचे सांगत हे अत्यंत खेदजनक असल्याचे भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सांगितले. मुंबईवर २६ नोव्हेंबरला झालेल्या आतापर्यंतच्या सर्वांत भयानक दहशतवादी हल्ल्याला मंगळवारी पाच वर्षे पूर्ण झाली. संपूर्ण देशभरात मंगळवारी या हल्ल्यात बळी गेलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी या हल्ल्यावरून केंद्र सरकारबद्दल नाराजी व्यक्त केली.
ते म्हणाले, २६/११ हल्ल्यामागील दोषींना शिक्षा ठोठावण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. केंद्र सरकारने आता तरी निर्णायक भूमिका घेतलीच पाहिजे. भारताच्या सुरक्षेला किती धोका आहे, याचे २६/११ हे उदाहरण आहे. या हल्ल्यात शहीद झालेल्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, याची खात्री आपण पीडितांच्या नातेवाईकांना दिली पाहिजे. सशक्त आणि सुरक्षित भारत निर्माण करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची वेळ आली आहे.