‘लष्कर ए तोइबा’चा कमांडर झाकीऊर रेहमान लख्वी याला मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात दहशवादविरोधी न्यायालयाने गुरुवारी जामीन मंजूर केला. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा कट आखणे आणि हल्ला घडवून आणण्यात साह्य़ करणे, असे आरोप लखवी याच्यावर ठेवण्यात आले आहेत. हल्ल्यातील सात आरोपींपैकी लखवी हा एक आरोपी आहे.
मंगळवारी पेशावर येथील लष्करी शाळेतील नृशंस हत्याकांडाच्या निषेधार्थ बुधवारी देशातील सर्व न्यायालयांमधील वकिलांनी उत्स्फूर्त बंद पाळला असताना लखवी आणि इतर सहा आरोपींनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. दहशतवादविरोधी न्यायालयाने गुरुवारी त्याचा अर्ज मंजूर केला. लख्वी याच्यावतीने अ‍ॅड. रिझवान अब्बासी यांनी न्यायालयात बाजू मांडली. सुरुवातीला ‘एफआयए’ (फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी)च्या वकिलाने लखवी याला जामीन मिळू नये, अशी मागणी केली. परंतु रिझवान यांच्या विनंतीवरून त्याला जामीन मंजूर करण्यात आला, असे ‘डॉन’ या वृत्तपत्राने म्हटले.

शरीफ यांची घोषणा आणि सुटका
पाकिस्तानातील कानाकोपरा हा दहशतवादमुक्त असायला हवा, अशी घोषणा पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी बुधवारी केली होती. याशिवाय दहशतवादाच्या बीमोडासाठी येत्या आठवडाभरात राष्ट्रीय कृती आराखडा तयार करण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी लख्वी याला तुरुंगातून मुक्त करण्यात आले आहे.