इक्वेडोरमधील मोठय़ा भूकंपात बळी पडलेल्यांची संख्या आता २७२ झाली असून ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे कारण अजून भूकंपाने कोसळलेल्या घरांचे ढिगारे उपसण्याचे काम सुरू आहे. हा भूकंप ७.८ रिश्टर तीव्रतेचा होता व दक्षिण अमेरिकेतील तेल उत्पादक देश म्हणून गणल्या जाणाऱ्या इक्वेडोरमधील अनेक हॉटेल्स, घरे शनिवारी उशिरा झालेल्या भूकंपात जमीनदोस्त झाली आहेत. इमारती कोसळल्याने दोन हजार लोक जखमी झाले आहेत. राजधानी क्विटो येथे वीज पुरवठा खंडित झाला असून तेल उत्पादक सुविधांना मात्र धक्का पोहोचलेला नाही. पॅसिफिक किनाऱ्यालगत असलेल्या कोलंबिया मेक्सिको व एल साल्वादोर यांनी मदत पथके पाठवली आहेत.

पोटरेविजो येथे भूकंपाच्या धक्क्य़ाने तुरुंगाच्या भिंती कोसळल्या असल्या तरी १०० कैदी पळून गेले आहेत त्यातील काहीजणांना परत पकडून आणण्यात आले, तर काही स्वत:हून परत आले. न्याय मंत्री लेडी झुनिगा यांनी सांगितले की, काही कैदी पळाले असले तरी त्यांना पुन्हा पकडून आणले जाईल. पोटरेविजो येथे इतरत्र मृतदेहाचे विघटन सुरू झाले आहे, तरीही मदतकार्य सुरू ठेवण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. एल गटो या हॉटेलची सहा मजली इमारत कोसळली त्याच्या ढिगाऱ्यातून तीन मृतदेह बाहेर काढले असून आणखी  १० ते ११ जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. जास्त हानी झालेल्या भागात आपत्कालीन स्थिती जाहीर करण्यात आली असून अध्यक्ष रफाल कोरिया यांनी रविवारी भूकंपग्रस्त भागांना भेट दिली. ते व्हॅटिकनला गेले होते तेथून दौरा अर्धवट सोडून परत आले आहेत. त्यांनी सांगितले की, मृतांचा आकडा २७२ असला तरी तो वाढण्याची शक्यता जास्त आहे.