एपी, देर अल-बालाह
‘हमास’ने अपहरण केलेल्या ४ ओलिसांची सुटका करताना, इस्रायलच्या हवाई आणि जमिनीवरील हल्ल्यात सुमारे २७४ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने रविवारी दिली. शनिवारच्या हल्ल्यात सुमारे ७०० नागरिकही जखमी झाले. लष्कराने सांगितले की, त्यांच्या सैन्याने दिवसा संपूर्ण प्रदेशात जोरदार गोळीबार केला. यात अनेक नागरिकांचा विशेषत: महिला आणि लहान मुलांचाही मृत्यू झाला.
७ ऑक्टोबरपासून हमास आणि इतर अतिरेक्यांनी सीमेपलीकडे घुसून सुमारे १२०० लोकांची हत्या करून सुमारे २५० नागरिकांना ओलिस बनवले होते. तेव्हापासून मध्य गाझामध्ये सुरू असलेले हे सर्वांत मोठे बचावकार्य होते.इस्रायली सैन्याने गोळीबार करत एकाच वेळी दोन ठिकाणी छापे टाकल्यानंतर नोआ अर्गामनी (२६), अल्मोग मीर जाने (२२), आंद्रे कोझलोव्ह (२७) आणि स्लोमी झिव्ह (४१) आदी ओलिसांची सुटका केली.संगीत महोत्सवातून अपहरण करून ओलीस ठेवण्यात आलेल्या इतर तिघांप्रमाणे २६ वर्षीय नोआ अर्गमनी प्रसिद्ध झाली होती. तिच्या अपहरणाच्या चित्रफितीमध्ये ती एका दुचाकीवरून दोन पुरुषांच्या मध्ये बसलेली दिसते. तसेच ‘मला मारू नका’, असे ती ओरडत होती.