Nepal Landslide Rescue Ministry External Affairs: नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापूर आणि भूस्खलनाला ७२ तासांहून अधिक काळ लोटल्यानंतरही २८७ भारतीय नागरिक अद्याप बेपत्ता आहेत. याव्यतिरिक्त भारतीय वंशाचे इतर देशांचे नागरिकत्व असलेले १२८ जणही बेपत्ता असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. दरम्यान, पूरग्रस्त भागातून भारतीय नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी आणि मदतकार्यासाठी भारताने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत.
परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दिवसभरात ८८ भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. तसेच रसुवा येथील एका जलविद्युत प्रकल्पात अडकलेल्या चार भारतीयांची सुटका करण्यात आली असून त्यांना काठमांडू येथे हलवण्यात येत आहे. याशिवाय चीनमधून १२० भारतीय नागरिक नेपाळच्या सीमेत दाखल झाले असून, त्यांना भारतात परत आणण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात येत आहे.
मृतदेहांच्या ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू
नेपाळमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली असून मृतदेहांची ओळख पटवणे नेपाळी प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरत आहे. या पार्श्वभूमीवर मृतांची ओळख पटवण्यासाठी आणि ‘डीएनए’ नमुन्यांचे विश्लेषण करण्यासाठी भारतातील न्यायवैद्यक तज्ज्ञांची सहा पथके काठमांडूमध्ये दाखल होत आहेत.
बोगद्यांमधील बचावकार्यासाठी विशेष पथक
जलविद्युत प्रकल्पांच्या बोगद्यांमध्ये अडकलेल्या लोकांच्या बचाव कार्याची पाहणी करण्यासाठी भारताने एक विशेष टेहळणी पथक पाठवले होते. या पथकाने नेपाळी लष्कराच्या साथीने चिलीमे आणि लांगटांग जलविद्युत प्रकल्पांच्या भागातील बोगद्यांची पाहणी केली आहे. या पथकाच्या अहवालानंतर, आधुनिक उपकरणांसह सज्ज असलेले भारताचे विशेष बोगदा बचाव पथक मदतकार्यासाठी पोहोचत आहे. नेपाळमधील भारताचे राजदूत नवीन श्रीवास्तव यांनी या मोहिमेचा आढावा घेत, “भारत या संकटाच्या काळात नेपाळला सर्वतोपरी सहकार्य करत राहील,” असा विश्वास व्यक्त केला.
मृतांचा आकडा ६६९ वर; हजारो बेपत्ता
नेपाळ पोलिसांच्या ताज्या आकडेवारीनुसार, भोटेकोशी नदीला आलेल्या महापुरात आतापर्यंत ६६९ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २,३६२ लोक अद्याप बेपत्ता आहेत. बेपत्ता नागरिकांमध्ये १,८६३ नेपाळी आणि ४९९ परदेशी नागरिकांचा समावेश आहे. बचाव पथकांनी आतापर्यंत २,३०१ जखमी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले असून, नुवाकोट येथील नऊ मदत केंद्रांमध्ये सुमारे एक हजार विस्थापित नागरिकांची राहण्याची सोय करण्यात आली आहे.
मदत साहित्याची तिसरी खेप रवाना
भारताने शुक्रवारी १० टन मदत साहित्याची तिसरी खेप, ११ वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे पथक आणि मदत साहित्य नेपाळला पाठवले आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ‘एक्स’वर दिलेल्या माहितीनुसार, या साहित्यात पोर्टेबल जनरेटर, डिग्निटी किट्स, अन्नधान्य पाकिटे आणि पाणी शुद्धीकरणाच्या गोळ्यांचा समावेश आहे. लवकरच आणखी एक मदत विमान नेपाळला रवाना केले जाणार आहे.
