नेपाळमध्ये हिमस्खलनामुळे आलेल्या महापुरात आतापर्यंत २७७ जणांचा मृत्यू झाला. हिमस्खलनामुळे ही पूरस्थिती निर्माण झाल्याचा प्राथमिक अंदाज वैज्ञानिकांनी वर्तवला आहे. या पुरामुळे काही क्षणांत मोठ्या वेगाने आलेल्या पाण्याने गावेच्या गावे वाहून नेल्याची भयानक दृश्ये सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. आता नेपाळच्या हिमस्खलनामुळे २८८ भारतीय बेपत्ता झाले आहेत अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काय सांगितलं?
२८८ भारतीयांशी संपर्क होऊ शकलेला नाही. यातले ७३ भारतीय नागरिक असे आहेत जे त्रिशुली १ पॉवर प्रोजेक्टसाठी काम करत होते. परराष्ट्र मंत्रालयाने हे देखील सांगितलं की आम्ही प्रोजेक्ट हेडच्या संपर्कात आहोत. नेपाळमध्ये संपर्क करण्याची साधनं आणि व्यवस्था कोलमडली आहे. त्यामुळे तिथे असलेल्या लोकांशी संपर्क करण्यातही बऱ्याच अडचणी येत आहेत. आज दुपारी १ वाजेपर्यंत २१ भारतीय नागरिकांना आम्ही सुरक्षित वाचवू शकलो आहेत. हे सगळे भारतीय नागरिक तामिळनाडूचे आहेत. त्यांची नावं आम्ही आमच्या एक्स हँडलवर पोस्ट करत आहोत असंही रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट केलं.
नेपाळमधील स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी सुमारे ८.३० वाजता देशातील ल्हेंडे खोला आणि भोते कोशी नदीच्या परिसरात अचानक भीषण पूर आला. या पुराच्या पाण्यात अनेक भागातील रस्ते, घरे आणि पादचारी पूल वाहून गेले. या पुरामुळे तिबेट आणि नेपाळदरम्यान असलेल्या ग्यिरॉन्ग बंदर परिसरात मोठ्या प्रमाणात चिखलाचा ढिगारा आला. त्यामुळे या भागातील वीजपुरवठा आणि दळणवळणाची साधनेही ठप्प झाली. या दुर्घटनेत आतापर्यंत १६० जणांचा मृत्यू झाला असून ३४१ परदेशी नागरिकांसह ७५० हून अधिक जण बेपत्ता झाले आहेत. आता केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार २८८ भारतीयांशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही. तसंच सगळी यंत्रणा कोलमडून पडल्याने अनेक अडचणीही येत आहेत.
