पाकिस्तानने गेल्या पाच वर्षात २९८ भारतीय निर्वासितांना नागरिकत्व दिल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाने संसदेमध्ये ही माहिती दिली. २०१४ मध्ये सर्वाधिक ७६ भारतीय निर्वासितांनी पाकिस्तानचे नागरिकत्व स्वीकारले.

सत्ताधारी ‘पाकिस्तान मुस्लिम लीग- नवाझ’ या पक्षाचे खासदार शेख रोहैल असघर यांनी संसदेत भारतीय निर्वासितांविषयी प्रश्न उपस्थित केला होता. यावर पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांनी आकडेवारीच सादर केली. २०१२ ते १४ एप्रिल २०१७ या कालावधीत २९८ भारतीय निर्वासितांना पाकिस्तानचे नागरिकत्व देण्यात आले अशी माहिती त्यांनी दिली. २०१२ मध्ये ४८ भारतीय निर्वासितांना, २०१३ मध्ये ७५ आणि २०१४ मध्ये ७६ निर्वासितांना पाकिस्तानचे नागरिकत्व देण्यात आले. तर २०१५ मध्ये फक्त १५ निर्वासितांना तर २०१६ मध्ये ६९ जणांना नागरिकत्व देण्यात आले अशी माहिती गृहमंत्रालयाने दिली.

पाकिस्तानमध्ये नागरिकत्वाचे कठोर नियम असून निर्वासितांसाठी पाकिस्तानचे नागरिकत्व मिळवण्याची प्रक्रिया अत्यंत कठीण मानली जाते. भारत, अफगाणिस्तान, बांगलादेश या देशांमधून आलेल्या निर्वासितांची संख्या सर्वाधिक आहे असे पाकच्या गृहमंत्रालयाने म्हटले आहे.गेल्या वर्षी एका भारतीय महिलेने पाकिस्तानचे नागरिकत्व स्वीकारले होते. ही घटना पाकमध्ये चर्चेचा विषय ठरली होती. संबंधीत महिलेने पाकिस्तानी नागरिकाशी लग्न केले होते. तिच्या पतीचे निधनही झाले होते. मात्र पतीच्या निधनानंतर सावत्र मुलाने तिला सोडून दिले. २००८ मध्येच महिलेने नागरिकत्वासाठी अर्ज केला होता. पण तेव्हापासून तिचा अर्ज प्रलंबित होता. पाकिस्तानचे नागरिकत्व नसल्याने त्या महिलेची कोंडी झाली होती. शेवटी पाकिस्तानचे तत्कालीन गृहमंत्री चौधरी निसार अली खान यांनी गेल्या वर्षी मार्चमध्ये महिलेला नागरिकत्व दिले.