टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात डीएमकेच्या खासदार कनिमोळी दोषमुक्त झाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवरुन कनिमोळींचे अभिनंदन केले आहे. माझ्या मैत्रिणीला न्याय मिळाला, अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी कनिमोळींचे अभिनंदन केले.

टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने गुरुवारी तत्कालीन दूरसंचार मंत्री ए. राजा, डीएमकेच्या खासदार कनिमोळी यांच्यासह १७ आरोपींना दोषमुक्त केले. सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने आरोपींची सुटका केली आहे. न्यायालयाच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवरुन प्रतिक्रिया दिली. ‘माझ्या मैत्रिणीसाठी मला आनंद होतोय. तिला न्याय मिळाला’ असे ट्विट सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

कनिमोळी या डीएमकेचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांच्या कन्या आहेत. टू जी घोटाळ्याप्रकरणी त्या तुरुंगातही होत्या. न्यायालयाच्या निर्णयावरही कनिमोळींनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, अखेर आम्हाला न्याय मिळाला, डीएमके पक्षासाठी हा सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. आमच्यावर झालेल्या आरोपांना हे उत्तर असल्याचे त्यांनी सांगितले. न्यायालयाच्या निकालामुळे घोटाळा झालाच नव्हता हे सिद्ध झाले, असे डीएमकेचे कार्यकारी अध्यक्ष एम के स्टॅलिन यांनी म्हटले आहे. न्यायालयाच्या निकालानंतर डीएमकेच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला. तामिळनाडूतील काही भागांमध्ये कार्यकर्त्यांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला.