अमेरिकेमध्ये उत्तर डेट्रॉईटमधील एका शाळेवर एका हल्लेखोराने मंगळवारी गोळीबार केला, ज्यात तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आणि आठ जण जखमी झाले. प्रशासनाने हा या वर्षातील सर्वात प्राणघातक हल्ला असल्याचे म्हटले आहे. हल्ल्यानंतर आरोपीने स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. पोलिसांना दुपारी १२:५५ च्या सुमारास उत्तर डेट्रॉईटच्या उपनगरातील ऑक्सफर्ड टाउनशिपमधील ऑक्सफर्ड हायस्कूलमध्ये एक बंदूकधारी व्यक्ती फिरत असल्याची माहिती देण्यात आली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

ऑकलंड काउंटी शेरीफ कार्यालयाने सांगितले की एका संशयितास अटक करण्यात आली असून त्याच्याकडून एक पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. शेरीफच्या कार्यालयाने सांगितले की या हल्ल्यात एकापेक्षा जास्त व्यक्तींचा समावेश नव्हता. गोळीबारात आठ जण जखमी झाल्याचेही त्यांनी सांगितले.

शेरीफच्या म्हणण्यानुसार, गोळीबारात ठार झालेल्यांमध्ये एक विद्यार्थी १६ वर्षांचा, एक १४ वर्षांचा आणि एक १७ वर्षांचा आहे. त्याचबरोबर जखमींपैकी सहा जणांची प्रकृती आता स्थिर असून उर्वरित दोघांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

ऑक्सफर्ड कम्युनिटी स्कूलचे अधीक्षक टिम थ्रोन म्हणाले की. त्यांना अद्याप पीडितांची नावे किंवा त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला असल्याबाबत माहित नाही. मला धक्का बसला आहे. हे विनाशकारी आहे, असे अधीक्षकांनी पत्रकारांना सांगितले.

हल्ल्यानंतर शाळा बंद करण्यात आली तर काही मुलांनी बंद वर्गात आश्रय घेतला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी परिसराची झडती घेतली. नंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांकडे सोपवण्यासाठी जवळच्या किराणा दुकानात नेण्यात आले होते.

शाळेच्या प्रशासानाने नोव्हेंबरमध्ये शाळेच्या वेबसाइटवर पालकांना दोन पत्रे पोस्ट केली होती. विचित्र तोडफोडीच्या घटनेनंतर शाळेला धमकी दिल्याच्या अफवांना ते प्रतिसाद देत असल्याचे त्यात म्हटले होते.