भारताने ओमानजवळ झालेल्या व्यापारी जहाजावर जो हल्ला करण्यात आला त्याचा निषेध नोंदवला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली आहे की या हल्ल्यानंतर जहाजावर असलेल्या २४ पैकी २१ भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. पण तीन भारतीय नागरिक अजूनही बेपत्ता आहेत.

परराष्ट्र मंत्रालयाने काय म्हटलं आहे?

आज सकाळी ओमानच्या तटावर सेटबेल्लो या व्यापारी जहाजावर हल्ला झाला. ही बाब अत्यंत निषेधार्ह आहे. जहाजावर २४ भारतीय होते. त्यापैकी २१ जणांची सुटका झाली आहे. अजूनही तीन भारतीय बेपत्ता आहेत. ओमान या ठिकाणी जो भारतीय दुतावास आहे त्यांचं या घटनेकडे बारकाईने लक्ष आहे. तीन भारतीय नागरिक बेपत्ता आहेत, त्यांच्यासाठीची शोध मोहीम अद्यापही सुरु आहे. भारतीय दुतावासाचे अधिकारी हे ओमानच्या अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्कात आहेत. या ठिकाणी जो जहाजांचा भाग आहे त्यावर होणारे हल्ले ही चिंतेची बाब आहे. या ठिकाणी जो संघर्ष चालला आहे त्याचाच हा परिणाम आहे. या ठिकाणी धोरणात्मक निर्णय झाला पाहिजे आणि तोडगा निघाला पाहिजे ही मागणी आम्ही पुन्हा एकदा करतो आहोत. असं झालं तरच या भागात शांतता पुन्हा एकदा प्रस्थापित होईल. तसंच व्यावसायिक जहाजांवर आणि नागरि सेवा सुविधांवर आणि पायाभूत सुविधांवर हल्ले होणं थांबलं पाहिजे अशीही आमची आग्रही मागणी आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.

सेटबेलो जहाजावर हल्ला

सेटबेलो या जहाजावर हल्ला करण्यात आला आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार मेरिटाइम सिक्युरिटी ग्रुप एम्ब्रेच्या हवाल्याने हे म्हटलं आहे की इराणची नाकेबंदी करण्यासाठी अमेरिकेने हा हल्ला केला. आधी जहाजावरच्या क्रू मेंबर्सना याबाबत सावध करण्यात आलं होतं. त्यांना हे सांगण्यात आलं होतं की जहाजाच्या मागच्या बाजूला एका ठिकाणी जमा आणि शांत रहा. त्यानंतर या व्यावसायिक जहाजावर हल्ला करण्यात आला. याबाबत अद्याप अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने प्रतिक्रिया दिलेली नाही.

या आधी याच आठवड्यात मारिवेक्स या जहाजावरही हल्ला करण्यात आला होता. त्यामध्ये २४ भारतीय होते. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं की आज जो हल्ला झाला त्यात तीन भारतीय बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्यात येतो आहे. शोध मोहिम राबवली गेली आहे. ओमानमध्ये घडलेल्या या घटनेबाबत भारतीय दुतावास लक्ष ठेवून आहे. आम्ही स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात सातत्याने आहोत. आत्तापर्यंत ओमानच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला पुढील माहिती दिलेली नाही. सातत्याने व्यावसायिक जहाजांवर जे हल्ले केले जात आहे ती बाब अयोग्य आहे. तसंच आम्ही या घटनेचा निषेध नोंदवतो असंही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.