एपी, देर अल-बला : इस्रायलने संपूर्ण गाझामध्ये केलेल्या हल्ल्यांमध्ये किमान ३० पॅलेस्टिनी ठार झाले, अशी माहिती गाझातील रुग्णालयांनी दिली. मृतांमध्ये अनेक लहान मुलांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. इस्रायल आणि हमासदरम्यान १० ऑक्टोबरला झालेल्या शस्त्रसंधीनंतर इस्रायलने केलेला हा सर्वात मोठा हल्ला आहे.
शस्त्रसंधीचा भाग म्हणून इस्रायलने इजिप्तला लागून असलेली राफा सीमा रविवारी उघडणार असल्याची घोषणा शुक्रवारी केली होती. ही सीमा ऑक्टोबर २०२३पासून बंद होती. मात्र, ती उघडण्यापूर्वीच हमासने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचा दावा करत इस्रायलने पुन्हा एकदा गाझामधील सामान्य नागरिकांना लक्ष्य केले.
विविध रुग्णालयांनी दिलेल्या माहितीनुसार, गाझा शहरातील एक इमारत, खान युनिस येथील निर्वासितांची छावणी या ठिकाणी हल्ले करण्यात आले. गाझा शहरातील एका पोलीस ठाण्यावरही हल्ला करण्यात आला. त्यात किमान १४ जण ठार झाले आणि अनेक जण जखमी झाले, अशी माहिती शिफा रुग्णालयाचे संचालक मोहम्मद अबू सेलमिया यांनी दिली.
शस्त्रसंधीसाठी मध्यस्थी करणार्या इजिप्तने या हल्ल्यांचा कठोर शब्दांमध्ये निषेध केला आहे. इस्रायलने केलेल्या या हल्ल्यांमुळे दोन्ही गटांची शस्त्रसंधी समाप्त होण्याचा धोका असल्याचे इजिप्तने म्हटले आहे.
‘हे युद्ध आहे की शांतता?’
खान युनिसमधील नासेर रुग्णालयाने माहिती दिली की, येथील निर्वासितांच्या मदत छावणीवरील हल्ल्यामुळे आग लागली आणि त्यामध्ये एकाच कुटुंबातील तीन लहान मुलांसह सात जणांचा मृत्यू झाला. येथील एक रहिवासी अताल्ला अबू हदायद याने सांगितले की, ‘‘हल्ल्यानंतर आम्ही पळत आलो. आग लागली होती आणि मला माझी भावंडे जमिनीवर पडलेली दिसली. येथे युद्ध सुरू आहे की शांतता आहे, हेच आम्हाला कळत नाही,’’ अशा शब्दांमध्ये त्याने आपली हतबलता व्यक्त केली.

