Hyderabad Destination Wedding Groom Dies: लग्न म्हटलं की, दोन कुटुंबांचा आनंदाचा सोहळा असतो. लगीनघाई असलेल्या घरात बरीच लगबग सुरू असते. खरेदी, पाव्हण्यांचा मानपान, नियोजन, लग्न सुरळीत पार पाडण्याची गडबड अशा एक ना अनेक गोष्टी वधू-वरांच्या कुटुंबात एकत्रित सुरू असतात. साहजिकच यात ताणही येतो. हल्ली तर डेस्टिनेशन वेडिंगसारखे प्रकार आले आहेत. यात प्रचंड पैसा खर्च केला जातो. हैदराबादमध्ये अशाच एका लग्नाचा ताण असह्य झाल्यामुळे लग्नाआधीच नवऱ्यामुलाचा मृत्यू झाला आहे.
नेमके प्रकरण काय?
एम. वेंकट कृष्णा श्रीसाई (वय ३०) याचे १२ एप्रिल रोजी लग्न होणार होते. मात्र लग्नाच्या पाच दिवस आधीच श्रीसाईने स्वतःचे जीवन संपवले. त्याच्या अकस्मात मृत्यूमुळे वधू आणि वराच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
श्रीसाई तेलंगणा राज्याच्या कोंडापूर येथे एका अपार्टमेंटमध्ये राहत होता. त्याची एक ॲनिमेशन कंपनी आहे. विशाखापट्टनम येथील एका मुलीबरोबर त्याचे २२ फेब्रुवारी रोजी लग्न ठरले होते. दोघांच्या कुटुंबीयांनी डेस्टिनेशन वेडिंग करण्याचे नियोजन केले. या लग्नासाठी श्रीसाईने लग्नाच्या आयोजकांना १७ लाख रुपये देण्याचे मान्य केले होते. यापैकी १० लाख रुपये त्याने आधीच दिले. तेलंगना टुडेने दिलेल्या बातमीनुसार, उरलेल्या पैशांची जुळवजुळव करत असताना श्रीसाई तणावाखाली आला होता.
भावाला पाठवला शेवटचा संदेश
मंगळवारी (७ एप्रिल) श्रीसाईने आपल्या भावाला शेवटचा मेसेज केला. आपण खूप मानसिक तणावात असल्याचे या मेसेजमध्ये श्रीसाईने लिहिले. मेसेज मिळाल्यानंतर भावाने तातडीने त्याच्या घरी धाव घेतली. पण घरी पोहोचल्यानंतर श्रीसाई दार उघडत नव्हता. त्याचा फोनही तो उचलत नसल्यामुळे भाऊ आणि शेजाऱ्यांनी घराचे दार तोडून आत प्रवेश केला.
श्रीसाई घरातच रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.

पोलिसांनी काय सांगितले?
श्रीसाईला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले. पोलिसांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, श्रीसाईने आधी पेनकिलर गोळ्या घेऊन नंतर धारदार वस्तूने स्वतःला जखमी करून घेतले. लग्नाचा खर्च, सामाजिक दबाव याचा मानसिक ताण आल्यामुळे श्रीसाईने टोकाचे पाऊल उचलले असावे, असा कयास पोलिसांनी बांधला.
या प्रकरणी आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. श्रीसाईच्या मृत्यूशी निगडित सर्व पैलूंचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
