अयोध्येतील राम मंदिराच्या पुजारी पदासाठी एक दोन नाही तीन हजार अर्ज आले. त्यापैकी २०० लोकांची निवड मुलाखतीसाठी झाली आहे. त्यांना विचारले जाणारे प्रश्न चर्चेत आहे. मकर संक्रांत झाल्यानंतर २२ जानेवारी २०२४ या दिवशी रामलल्ला मंदिरात विराजमान होणार आहेत.
अयोध्येच्या राम मंदिर विश्वस्त मंडळाचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी यांनी सांगितलं २०० जणांची निवड त्यांच्या योग्यतेच्या आधारे झाली आहे. आता त्यांची मुलाखत घेतली जाते आहे. या सगळ्यांच्या मुलाखतीचं केंद्र हे अयोध्येतील विश्व हिंदू परिषदेचं मुख्यालय असलेल्या कारसेवक पुरम आहे. अयोध्येतले दोन महंत मिथिलेश नंदिनी शरण आणि सत्यनारायण दास आणि वृंदावनचे जयकांत मिश्रा या तिघांचं पॅनल या सगळ्यांची मुलाखत घेतं आहे.
२०० पैकी २० पुजारी निवडले जाणार
तीन हजार अर्जांमधून जे २०० अर्ज निवडले गेले आहेत त्यांच्या मुलाखती झाल्यानंतर त्यातले २० जण पुजारी म्हणून निवडले जाणार आहेत. गोविंद देवगिरी यांनी सांगितलं की ज्यांची निवड होईल त्यापैकी २० जण पुजारी आणि इतर पदांवर कार्यरत असतील. तसंच या सगळ्यांना सहा महिन्यांचं विशेष प्रशिक्षण दिलं जाणार आहे. ते झाल्यानंतरच नियुक्ती केली जाणार आहे. ज्यांची निवड होणार नाही त्यांनाही प्रशिक्षणात सहभाग घेता येईल. त्यांना सहभाग प्रमाणपत्र दिलं जाईल. ज्यांच्याकडे हे प्रमाणपत्र असेल त्यांना भविष्यात संधी मिळू शकते. प्रशिक्षणाच्या दरम्यान मोफत भोजन, राहण्याची मोफत व्यवस्था आणि दोन हजार रुपयांचा भत्ता दिला जाणार आहे.
पुजारी होण्यासाठी मुलाखतीत काय प्रश्न विचारले जात आहेत?
संध्या वंदन काय आहे?
संध्या वंदनाचा धार्मिक विधी काय आहे?
संध्या वंदनाचा मंत्र काय आहे?
भगवान रामाची पूजा करण्यासाठी कुठला मंत्र म्हणायचा?
भगवान रामाची पूजा करण्यासाठी कुठला धार्मिक विधी करायचा?
हे आणि या प्रकारचे प्रश्न मुलाखतींच्या दरम्यान विचारले जात आहेत. २०० पैकी वीस जणांची निवड केली जाणा आहे.
अयोध्येत जे राम मंदिर उभं राहतं आहे तिथली पूजा ही रामानंदीय संप्रदायाच्या पद्धतीप्रमाणे असणार आहे. या पूजेसाठी खास अर्चक असणार आहेत. भगवान रामालला नैवैद्य दाखवणं, नवी वस्त्र घालणं त्यानंतर पूजा आणि आरती यांसह पंचोपचारांनी पूजा केली जाते आहे. मात्र २२ जानेवारीपासून पूजा पद्धती बदलणार आहे. रामलल्लाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर रामानंदीय परंपरेनुसार पूजा केली जाणार आहे. इंडिया टुडेने या विषयीचं वृत्त दिलं आहे.