पूर्व लडाखमध्ये गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या जवानांच्या चकमकीत २० भारतीयांना हौतात्म्य आलं होतं. त्यानंतर भारत चीन दरम्यान मोठा तणाव निर्माण झाला असून, सर्वच भारतीयांच्या मनात चीनविषयी तीव्र भावना निर्माण झाल्या आहेत. देशभरात चिनी वस्तुंचा बहिष्कार करण्याची मागणी होतेय. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी Boycott Chinese Product अशी मोहिम राबवली आहे.

याच दरम्यान, राजधानी दिल्लीत ‘कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’कडून (CAIT) चिनी वस्तुंच्या बहिष्काराचं समर्थन करण्यात आले आहे. त्यासोबतच (CAIT) या संघटनेकडून दिल्लीतील ३००० बजेट हॉटेल आणि गेस्ट हाऊसमध्ये यापुढे चिनी नागरिकांना राहण्याची परवानगी दिली जाणार नाही. या हॉटेल आणि गेस्ट हाऊसचे जवळपास ७५ हजार खोल्या आहेत. गुरुवारी बजेट हॉटेल्सच्या संघटना असलेल्या ‘दिल्ली हॉटेल अँड गेस्ट हाऊस ओनर्स असोसिएशन’नं (धुर्वा) या निर्णयाची घोषणा केली.

चीनच्या दररोजच्या अरेरावीपणाला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं CAIT म्हटलं आहे. चीन भारतासोबत ज्या पद्धतीनं व्यवहार करत आहे आणि ज्या पद्धतीनं सीमेवर भारतीय सैनिकांची चिनी सैनिकांकडून निर्घृण हत्या करण्यात आली, त्यानंतर दिल्लीच्या सर्व हॉटेल व्यावसायिकांच्या मनात चीनबद्दल मोठा राग आहे, असं ‘दिल्ली हॉटेल असोसिएशन’चे अध्यक्ष संदीप खंडेलवाल यांनी म्हटले आहे. चीन म्हणजे जग नाही, त्यांच्या वस्तूशिवाय आपणही जगू शकतो, आम्ही कायद्याचे पालन करणारे नागरिक आहोत आणि कोणीही कायदा हातात घेणार नाही. परंतु यामुळे चिंतेची बाबा आहे कारण, युद्ध आणि व्यापार एकाच वेळी घडू शकत नाही, असेही ते म्हणाले.