लॉकडाउनमुळं रखडलेल्या सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्यानंतर आता या परीक्षांच्या सुमारे दीड कोटी उत्तरपत्रिका तपासणीसाठी ३,००० शाळा उघडण्यात येणार असल्याचे केंद्रीय मनुष्यबळविकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी जाहीर केलं आहे. या शाळा उत्तरपत्रिका तपासणी केंद्र म्हणून सुरु ठेवण्यास  केंद्रीय गृह मंत्रालयानं परवानगी दिली आहे. तसेच येत्या ५० दिवसांत ही तपासणी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

पोखरियाल म्हणाले, “सीबीएसई बोर्डाशी संलग्न देशभरातील ३,००० शाळांची परीक्षा मुल्यमापन केंद्र म्हणून निवड करण्यात आली आहे. या केंद्रांवरुन देशभरातील दीड कोटींपेक्षा अधिक उत्तर पत्रिका तपासणीसाठी शिक्षकांच्या घरी पाठवण्यात येणार आहेत. उत्तर पत्रिकांची ही तपासणी प्रक्रिया पुढील ५० दिवसांमध्ये पूर्ण होईल. मर्यादीत काळासाठी केंद्रीय गृहमंत्रालयानं यासाठी विशेष परवानगी दिल्याबद्दल पोखरियाल यांनी गृह मंत्रालयाचे आभार मानले आहेत.”

दरम्यान, पोखरियाल यांनी शुक्रवारी सीबीएसईच्या दहावी आणि बारावीची अर्धवट राहिलेली परीक्षा १ जुलै ते १५ जुलै या काळामध्ये घेण्यात येईल असे जाहीर केले होते. ज्या विषयांचे पेपर आधी झाले आहेत ते पेपर पुन्हा घेण्यात येणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.