येत्या २७ ऑक्टोबरला गुजरातचे मुख्यमंत्री व भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची पाटणा येथील गांधी मैदानावर ‘हुंकार’ सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेचे विशेष म्हणजे मोदी यांच्या या सभेसाठी गुजरातच्या कापड व्यापाऱय़ांसाठी प्रसिद्ध असलेल्या सुरत शहरामधून ‘नमो’ मंत्र व कमळाच्या चिन्हाचे नक्षिकाम असलेले तब्बल ३०,००० लांब बाह्यांचे कुर्ते पाटण्याकडे मार्गस्थ करण्यात आले आहेत.
भाजपने सुरतमधील घाऊक कापड व्यापाऱ्यांना व कापड गिरण्यांना ‘नमो’ ब्रँडेड कुर्ते बनवण्याचे कंत्राट दिले आहे. सुरतमधील साड्यांचा एक लहान कारखानदारदेखील सध्या दक्षिण भारतमधील कापड बाजारात पाठवण्यात येणाऱ्या ‘नमो’ ब्रँड साड्यांवर चिटकवण्यात व्यस्त आहेत.
या कुर्त्यांचे शिलाई काम करणाऱ्या मुस्लिम समाजातील शिंप्यांच्या म्हणण्यानुसार हे कुर्ते मुस्लिमांच्या पेहरावाशी मिळते-जुळते आहेत. मुस्लिमांचा आवडता पेहराव ‘कफनी’ सारख्याच या कुर्त्यांच्या बाह्या लांब आहेत. फरक इतकाच की या कुर्त्यांच्या कॉलरवर व उजव्या छातीवर ‘नमो मंत्रां’चे नमो ‘देवनागरी’मध्ये व मंत्रा ‘इंग्रजी’मध्ये असे नक्षिकाम करण्यात आले आहे.    
नवरात्रीनिमित्ताने या कुर्त्यांपैकी ५००० कुर्ते सुरतमधील गरबा खेळणाऱ्या तरूणांना देण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. भगव्या रंगाचे नक्षीकाम असलेले हे कुर्ते पांढऱ्या व क्रिम शेडमध्ये उपलब्ध आहेत.  या सर्व कामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी भाजपचे सुरतचे खासदार चंद्रकांत रघुनाथ पाटील यांच्यावर सोपविण्यात आली आहे