एका डोंगराच्या पायथ्याशी दिसलेल्या एका साध्या सापाने पोलिसांना थेट अशा अड्ड्यावर पोहोचवले, जिथे एका फ्लॅटमध्ये तब्बल ३०९ अजगर बेकायदेशीरपणे पाळले आणि पैदास केले जात होते. चीनच्या झेजियांग प्रांतात ही धक्कादायक घटना समोर आली आहे.
एका सापाने उघड केला मार्ग
मार्च २०२४ मध्ये एका वृद्ध नागरिकाला डोंगराच्या पायथ्याशी एक मोठा अजगर दिसला. या भागात सामान्यतः अजगर आढळत नाहीत आणि त्या ऋतूत साप सुप्त अवस्थेत असतात. त्यामुळे हा साप कोणाच्या तरी तावडीतून सुटल्याचा संशय पोलिसांना आला. पोलीसांनी मालकाचा शोध सुरू केला, पण यश येत नव्हते.
वीज बिलाने पकडून दिले
तपासादरम्यान एका सर्पतज्ज्ञाने पोलिसांना एक महत्त्वाची टीप दिली. त्यांनी सांगितले की, अजगरांना जिवंत राहण्यासाठी आणि त्यांची पैदास होण्यासाठी वर्षभर प्रचंड उष्ण व दमट वातावरणाची गरज असते. यासाठी घरात मोठ्या प्रमाणावर हीटर्स आणि उपकरणे वापरावी लागतात, ज्यामुळे विजेचा वापर कमालीचा वाढतो. पोलीसांनी या धाग्यावरून परिसरातील वीज वापराच्या नोंदींची तपासणी सुरू केली. यात ‘गुओ’ नावाच्या व्यक्तीच्या घरातील वीज वापर जास्त असल्याचे आढळले.
संशय बळावला आणि छापा पडला
पोलीसांनी ‘गुओ’वर पाळत ठेवली असता, ‘डी’ नावाची दुसरी व्यक्ती त्याच्या घरी वारंवार जात असल्याचे दिसले. ‘डी’ नियमितपणे पांढरे उंदीर असलेले पार्सल मागवत असे. तसेच सोशल मीडियावर सापांचे फोटो टाकून त्यांच्या विक्रीचे केली जात होती. दोन सापांची बेकायदेशीर विक्री झाल्याचा पुरावा मिळताच पोलिसांनी गुओच्या फ्लॅटवर छापा टाकला.
घर बनवले सापांची फॅक्टरी
पोलीसांनी घरात पाऊल ठेवताच त्यांना धक्का बसला. गुओने आपल्या घराच्या हॉल आणि सर्व बेडरूम्सचे रूपांतर सापांच्या फॅक्टरीत केले होते. प्लास्टिकचे शेकडो कंटेनर एकावर एक रचून ठेवले होते आणि प्रत्येकात अजगर होता. गुओ स्वतः मात्र साऱ्या सापांमध्ये एका छोट्या खोलीत राहत होता. पोलीसांनी घरातून एकूण ३०९ अजगर जप्त केले आणि त्यांची रवानगी स्थानिक प्राणीसंग्रहालयात केली.
१० वर्षांपासून सुरू होता खेळ
चौकशीत गुओने कबुली दिली की त्याला सापांचे प्रचंड वेड होते. २०१४ मध्ये त्याने ४ अजगर खरेदी करून स्वतःच त्यांची पैदास कशी करायची हे शिकले. तो स्वतःला सापांचा ‘क्रिएटर’ समजत असे. आतापर्यंत या दोघांनी ८० अजगर विकले होते. पोलीसांनी या प्रकरणी त्यांना सुरुवातीला साप पुरवणाऱ्या ‘डेंग’ नावाच्या तिसऱ्या व्यक्तीलाही अटक केली असून, त्याच्या घरातूनही ४७ अजगर जप्त करण्यात आले आहेत.
