दक्षिण अफगाणिस्तानच्या कंदाहार शहरात बॉम्बस्फोट झाले. शुक्रवारी नमाज दरम्यान शिया मशिदीत झालेल्या या स्फोटात ३२ जण ठार झाले असून ५३ जण जखमी झाल्याची महिती मिळत आहे. या बॉम्बस्फोटातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. तर, हे बॉम्बस्फोट कोणी घडवून आणले, याबद्दल अद्याप कोणतीच माहिती नाही. दरम्यान, गेल्या आठवड्यात उत्तरेकडील कुंदुज शहरातील एका मशिदीत आत्मघाती हल्लेखोराने स्फोट घडवून आणला होता. या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेटने घेतली होती.
आज झालेल्या हल्ल्याबाबत एका प्रत्यक्षदर्शीने एएफपीला सांगितले, की त्याने तीन स्फोट झाल्याचे ऐकले. पहिला, मशिदीच्या मुख्य दरवाजाजवळ, दुसरा दक्षिणेकडील भागात आणि तिसरा जिथे लोक नमाज पठणापूर्वी हातपाय धुतात. दरम्यान, अंतर्गत मंत्रालयाचे प्रवक्ते कारी सय्यद खोस्ती यांनी या हल्ल्यानंतर ट्विट केले. “कंदाहार शहरात शिया बंधुंच्या एका मशिदीत स्फोट झाल्याची माहिती मिळाल्याने आम्ही दुःखी आहोत, या स्फोटात आमचे अनेक देशबांधव शहीद झाले आणि जखमी झाले आहेत,” असं त्यांनी म्हटलंय.