कर्नाटकमध्ये करोनाने पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. कोडगू जिल्ह्यातील निवासी शाळेतील ३२ विद्यार्थ्यांना करोनाची लागण झाली आहे. यामध्ये १० मुली आणि २२ मुलांचा समावेश आहे. एका आठवड्यापूर्वी या सर्व विद्यार्थ्यांची करोना चाचणी करण्यात आली होती. हे सर्व विद्यार्थी नववी ते १२ वीच्या वर्गातील आहेत.

जवाहर नवोदय विद्यालयात ही घटना घडली आहे. शाळेतील १० विद्यार्थ्यांना करोनाची लक्षणं जाणवत असून २२ विद्यार्थ्यांना कोणतीही लक्षणं जाणवत नाही आहेत. एका कर्मचाऱ्यालाही लागण झाली आहे. या कर्मचाऱ्याला करोनाची लक्षणं जाणवत आहेत. दरम्यान या सर्वांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

शाळेत एकूण २७० विद्यार्थी असून सर्वांची करोना चाचणी करण्यात आली आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांनी एनडीटीव्हीशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, “विद्यार्थ्यांची प्रकृती सुधारत असून चिंता करण्याचं काही कारण नाही. शाळेच्या संपूर्ण परिसराचं निर्जंतुकीकरण करण्यात आलं असून इतर सर्व काळजीही घेतली जात आहे. दरम्यान यामुळे शाळेचं टाइमटेबल बिघडलं असल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये चर्चा सुरु आहे”.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि इतर अधिकारी शाळेत पोहोचले होते. दरम्यान करोनाची लागण होऊ नये यासाठी शाळेत सुरक्षेच्या नियमांची अमलबजावणी केला जात आहे.