अग्निपथ योजनेविरोधात देशभरात तीव्र विरोध सरु असताना योजनेबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे. अग्निपथ योजनेबाबत खोट्या बातम्या पसरवणाऱ्या बिहारमधील ३५ व्हाॅट्सअप ग्रुपवर केंद्रीय गृहमंत्रालायाने बंदी घातली आहे. या प्रकरणी १० जणांना खोट्या बातम्या पसरवत तरुणांची दिशाभूल केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

केंद्राने व्हाॅट्सअप तथ्य तपासणीसाठी ८७९९७११२५९ हा क्रमांक जारी केला आहे. योजनेविरोधात वाढता विरोध पाहता बिहारमधील १२ जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. या इंटरनेटच्या माध्यमातून खोट्या बातम्या प्रसारित करुन जनतेला भडकवण्याच्या प्रयत्न केला जात असल्याचा आरोप सरकारने केला आहे.

लवकरच सैन्य भरती होणार असल्याची घोषणा
दिवसेंदिवस अग्निपथ योजनेला होणारा विरोध आणखी तीव्र होताना दिसत आहे. हजारोंच्या संख्येने तरुण रस्त्यांवर निदर्शने करताना दिसत आहेत. अग्निपथ योजनेसंदर्भात तीनही सैन्य दलाकडून एक संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यामध्ये अग्निपथ योजना रद्द होणार नसून लवकरच या योजनेअंतर्गत सैन्य भरती करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

भारत बंदची हाक
अग्निपथ योजनेला देशभरातून विरोध होत आहे. मात्र, बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये या विरोधाचे प्रमाण अधिक आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशमधील विद्यार्थांनी रसत्यावर उतरुन तोडफोड करत रेल्वेच्या डब्यांना आग लावल्याची घटना घडली आहे. काल (रविवार) विद्यार्थ्यांनी बिहार बंदची हाक दिली होती. या हाकेला विरोधी पक्षांनी पाठिंबा दर्शवला होता. दिल्लीतील जंतरमंतरवर काँग्रेसतर्फे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर आता बिहारमधील तरुणांनी भारत बंदची हाक दिली आहे.