इम्फाळ/नवी दिल्ली
मणिपूरमध्ये सुरक्षा दलांनी खंडणीखोर टोळ्यांविरुद्ध केलेल्या कारवाईत ३५०हून अधिक बंडखोरांना अटक केली आहे. या टोळ्यांनी खंडणीवसुलीचे स्वरूपच बदलवले असून ते आता वैवाहिक तसेच संपत्तीचा वाद मिटविण्यासाठी तसेच सरकारी निविदांमध्ये ‘कट’साठी पैशांची मागणी करू लागले आहेत, अशी माहिती रविवारी अधिकाऱ्यांनी दिली. राज्यात फेब्रुवारीत राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर या बंडखोरांना अटक करण्यात आली होती.
कारवाईदरम्यान अटक करण्यात आलेल्या ३५०हून अधिक बंडखोरांच्या चौकशीत सुरक्षा दलाच्या कठोर कारवाईमुळे निधीची कमतरता भासू लागली आहे. अटक करण्यात आलेले बहुतांश बंडखोर इम्फाळ पूर्व आणि पश्चिम या खोऱ्यातीलच आहेत. वैयक्तिक वाद, भांडणे, कौटुंबिक कलह, वैवाहिक वाद मिटविण्यासाठीच नव्हे तर एखादी समस्या असेल आणि तुमचा संपर्क असेल तर त्यासाठी हे बंडखोर ‘उपाय’ ठरू लागले आहेत. परंतु त्यासाठी किंमत मात्र मोजावी लागते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
राज्यात बंदी असलेल्या यूएनएलएफ, पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए), कांगलेई यावोल कानबा लुप (केवायकेएल) आणि पीपल्स रिव्होल्यूशनरी पार्टी ऑफ कांगलेईपाक (प्रेपाक)च्या कार्यकर्त्यांकडून खंडणी वसूल केली जात होती. सद्या:स्थितीत यूएनएलएफकडे ५३०, पीएलएकडे ४५० आणि केवायकेएलकडे २५ कार्यकर्ते असून, जे बहुसंख्य समुदाय गटांमध्ये सक्रिय आहेत.
तंत्रज्ञानाचा गैरवापर
बंडखोर गट सतत विकसित होत असून तंत्रज्ञानाचा गैरवापरही करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. इशान्येकडील राज्यात कोणत्याही कागदपत्रांविना मोबाइल सीम मिळवून ते वसुली करीत आहेत. यासाठी ते कोडवर्डचाही वापर करतात.
चार दहशतवाद्यांना अटक
मणिपूरच्या इम्फाळ पूर्व, इम्फाळ पश्चिम आणि थौबल जिल्ह्यांमधून सुरक्षा दलांनी बंदी घातलेल्या विविध संघटनांशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक केली आहे. हे दहशतवादी खंडणीवसुली आणि नवीन कार्यकर्त्यांची भरती करण्यात सहभागी होते, असे पोलिसांनी सांगितले.