केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात देशभरामध्ये मागील सात महिन्यांपासून सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलानासंदर्भात शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी महत्वाचं भाष्य करत केंद्र सरकारला इशारा दिलाय. लाला किल्ला आंदोलनाप्रकरणानंतर आता शेतकरी चार लाख ट्रॅक्टर घेऊन थेट संसदेवर मोर्चा काढणार असल्याचं टिकैत म्हणाले आहेत.

“इथे चार लाख ट्रॅक्टर आणि २५ लाख आंदोलक आहेत. हे सर्व ट्रॅक्टर्स याच देशातील असून ते अफगाणिस्तानमधून आलेले नाहीत. आम्ही मागील सात महिन्यापासून शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत. शेतकऱ्यांचं म्हणणं काय आहे हे ऐकून घेण्याइतकीही लाज सरकारकडे शिल्लक नाही. लोकशाहीमध्ये अशापद्धतीने काम करता येत नाही,” असा टोला टिकैत यांनी एएनआयशी बोलताना लगावला आहे.

तसेच एनडीटीव्हीशी बोलताना टिकैत यांना शेतकरी आंदोलनाची पुढील दिशा काय असेल असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, लाल किल्ला आंदोलन तर काहीच नाही आता आम्ही थेट संसदेवर ट्रॅक्टर घेऊन जाणार आहोत. सरकारने हे लक्षात ठेवावं की चार लाख ट्रॅक्टर आणि २५ लाख आंदोलक इथेच आहेत आणि २६ तारीख प्रत्येक महिन्याला येते.

या चर्चेदरम्यान टिकैत यांनी २६ जून रोजी देशातील सर्व राज्यांमधील राज्यपाल भवनासमोर शेतकरी धरणे आंदोलन करतील. शेतकरी आंदोलक राज्यपालांना अर्ज देतील. मात्र २६ जूनला कोणताही मोर्चा काढण्यात येणार नसल्याचंही टिकैत यांनी स्पष्ट केलं. तसेच इतर राज्यांमधील शेतकरी दिल्लीच्या सीमा ओलांडणार नाहीत असंही टिकैत म्हणालेत. दिल्लीतील शेतकरी उप राज्यपालांकडे अर्ज देतील.

तसेच टिकैत यांनी आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये ते भाजपाविरोधात प्रचार करणार असून भाजपाला मतदान न करण्याचं आवाहन आपण मतदारांना करणार आहोत असंही स्पष्ट केलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये विजेचे दर सर्वाधिक आहे आणि शेतकऱ्यांना ऊसाला योग्य भाव दिला जात नाही तसेच गव्हाची योग्य पद्धतीने खरेदी केली जात नाही यासंदर्भात मतदारांना सांगण्यात येणार आहे. याच विषयांचा आधार घेत भाजपाला मतदान न करण्याचं आवाहन आम्ही करणार आहोत. मात्र आम्ही प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये उतरणार नाही, असंही टिकैत यांनी स्पष्ट केलंय.