पीटीआय, चायबासा झारखंडच्या पश्चिम सिंघभूम जिल्ह्यात सोमवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ४ माओवादी ठार झाले. या चौघा माओवाद्यांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. या कारवाईत पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना अटक करण्यात सुरक्षा दलांना यश आले. रांचीपासून २०० किलोमीटर अंतरावील गुआ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लिपुंगा विभागात पहाटे पाचच्या सुमारास ही चकमक झाल्याची माहिती झारखंड पोलिसांचे प्रवक्ते आणि महानिरीक्षक अमोल होमकर यांनी ‘पीटीआय’ला दिली. विभागीय कमांडर कांदे होनहागा (रा. चायबासा, थळकोबाद), उपविभागीय कमांडर सिंगराई ऊर्फ मनोज (रा. जयगूर), कमांडर सूर्या ऊर्फ मुंडा देवगम आणि महिला कॅडर जुंगा पूर्ती ऊर्फ मारला अशी चौघा मृतांची नावे आहेत. तर कमांडर टायगर ऊर्फ पांडु हंसदा आणि बत्री देवगम अशी दोघा अटक केलेल्या माओवाद्यांची नावे आहेत. शोध मोहिमेदरम्यान एक इन्सास रायफल, दोन एसएलआर, तीन रायफल (.३०३) आणि एक (९ मिमी) पिस्तूल जप्त करण्यात आली आहे. हेही वाचा >>>चीन-फिलिपाईन्स जहाजांची धडक; दक्षिण चीन समुद्रावरील संघर्षांला हिंसक वळण सीपीआय (माओवादी) पॉलिटब्यूरो सदस्य मिसीर बेसरा आणि केंद्रीय समिती सदस्य अनल यांच्या पथकातील अजय महतो, कांदे आणि सिंगराई यांच्यासह काही माओवादी मोठा घातपात घडवून आणण्यासाठी लिपुंगा जंगलाजवळ आल्याची माहिती माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार चायबासा पोलिस, कोब्रा २०९, झारखंड जग्वार आणि सीआरपीएफ यांचा समावेश असलेल्या सुरक्षा दलांनी संयुक्त शोध मोहीम राबवली. हे पथक पहाटे पाचच्या सुमारास लिंपुगा जंगलाजवळ पोहोचले असता, माओवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. त्याला प्रत्युत्तरादाखल सुरक्षादलांनीही गोळीबार केला. सुमारे तासभर ही चकमक सुरू होती. गोळीबार थांबल्यानंतर पथकाने परिसराची झडती घेतली असता, अत्याधुनिक शस्त्रांसह चार जणांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले. तसेच तेथून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन माओवाद्यांना पथकाने अटक केली. सुरक्षा दलांच्या सततच्या कारवायांमुळे काही थोडय़ा भागातच माओवादी सक्रिय आहेत. ही ‘ऐतिहासिक’ कामगिरी असल्याचे सांगून होमकर यांनी माओवाद्यांना आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले आहे. माओवाद्यांवर प्रशासनातर्फे बक्षीस माओवादी कांदे होनहागा याच्यावर ५ लाख, सिंगराईवर १० लाख आणि सूर्यावर २ लाखांचे बक्षीस प्रशासनातर्फे ठेवण्यात आले होते. सिंगराई आणि कांदे हे ‘आयईडी’ तज्ज्ञ होते. सिंगराईला परिसरात आयईडी टाकण्याचे आणि त्यावर लक्ष ठेवण्याचे काम देण्यात आले होते, अशी माहिती होमकर यांनी दिली. जम्मू-कश्मीरच्या बांदीपोरामध्ये दहशतवादी ठार श्रीनगर : जम्मू-कश्मीरच्या बांदीपोरामध्ये सोमवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. दहशतवाद्यांची गुप्त माहिती मिळाल्यानंतर लष्कर आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी रविवार-सोमवारच्या मध्यरात्री गुरीहाजिन, अरागम बांदीपोरा भागात एक संयुक्त कारवाई केली. यात दहशतवाद्याला ठार करण्यात आल्याचे चिनार कॉर्प्सने ‘एक्स’वर म्हटले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी सुरक्षा जवानांवर गोळीबार केल्यानंतर चकमक सुरू झाली. ठार झालेल्या दहशतवाद्याची ओळख अद्याप पटलेली नाही. चकमकीच्या ठिकाणी एक मृतदेह आढळून आला आहे, तर परिसरात आणखी दहशतवाद्यांचा शोध सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.