क्रूर कृत्य : भावावर रोखली बंदूक… १५ वर्षीय मुलीवर केला सामूहिक बलात्कार

उत्तर प्रदेशात बंदुकीचा धाक दाखवत १५ वर्षीय मुलीवर भावासमोर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे

4 people gang raped 15 year old sister in front of her brother
उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथे ही घटना घडली आहे

उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथून अत्यंत घृणास्पद घटना समोर आली आहे. मुझफ्फरनगर येथे एका अल्पवयीन मुलीवर चार जणांनी सामूहिक बलात्कार केला आहे. त्यानंतर याचा मोबाईल वरून व्हिडिओ काढून या घटनेबद्दल इतर कोणास सांगितले तर तो व्हायरल करेल अशी धमकीही आरोपींनी दिली होती. यासह पीडितेच्या अल्पवयीन भावालाही बंदूक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणात चार आरोपींविरोधात पोस्को कायदा आणि सामूहिक बलात्काराच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या वैद्यकीय तपासणीनंतर पुढील कारवाई केली जात आहे सध्या याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

हे प्रकरण फुगाना पोलीस स्टेशन परिसरातील आहे. पीडितेचे वय १५ वर्षे आहे आणि तिच्या भावाचे वय १२ वर्षे आहे. त्यांचे आई वडिल २३ जुलै रोजी नौरंगाबाद येथे त्यांच्या नातेवाईकाच्या घरी गेले होते. घरी फक्त दोन मुलं होती. दिलेल्या तक्रारीत पीडितेच्या वडिलांनी सांगितले की ही घटना २३-२४ जुलै रोजी घडली. दोन्ही मुले झोपेत असताना त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका मुलाने छतावरून घरात उडी मारली आणि मुलीवर बंदूक रोखून धरली. त्याने घराचा दरवाजा उघडला आणि आणखी तीन मुलांना घरात घेतले.

पीडित मुलीच्या वडिलांनी आपल्या तक्रारीत सांगितले की, चौघांनी मिळून आपल्या मुलाला बंदूक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली होती. चौघांनी तिच्या भावासमोर जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार केला आणि जेव्हा मुलाने मदत मागण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने त्याला पुन्हा धमकावले. आवाज केला तर ठार मारण्यात येईल असे मुलाला सांगितले. त्यांनी बलात्काराचा एक व्हिडिओ शूट केला आणि मुलीला सांगितले की जर तिने तक्रार केली तर तो व्हायरल होईल असे  तिच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले. यानंतर मुलीला बेशुद्ध अवस्थेत सोडून चौघांनी तेथून पळ काढला.

त्यानंतर मुलीच्या भावाने वडिलांना फोन करुन सर्व घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांचे पालक धावत घरी आहे. जेव्हा त्यांनी चार मुलांच्या पालकांकडे याबाबत विचारले तेव्हा त्यांच्यात भांडणे झाली, असे तक्रारीत म्हटले आहे.  हे प्रकरण वाढवले तर त्यांना ठार मारण्यात येईल मारण्यात येईल अशी धमकी त्या मुलांच्या पालकांनी दिल्याचे पीडितेच्या वडिलांनी सांगितले. शनिवारी मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

“पीडित मुलीवर गावातीलच चार जणांनी बलात्कार केला आहे. ते त्याचे शेजारी आहेत आणि एकमेकांना चांगले ओळखतात. मिळालेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेची वैद्यकीय चाचणी केली गेली आहे. पुढील कारवाई केली जात आहे,” असे पोलिसांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: 4 people gang raped 15 year old sister in front of her brother abn

ताज्या बातम्या