संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून सभागृहात गोंधळ घालणाऱ्या काँग्रेसच्या सदस्यांवर लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन मंगळवारी संतप्त झाल्या. सभागृहातील मोकळ्या जागेत येऊन घोषणाबाजी करणाऱ्या सदस्यांच्या वर्तनाची, लोकशाहीच्या हत्येची चित्रफित प्रसारित करून जनतेला हे सदस्य किती बेजबाबदारपणे वागत आहेत ते दाखवा, असा आदेश महाजन यांनी लोकसभा टीव्हीला दिला.
काँग्रेसच्या सदस्यांचा गोंधळ टिपेला पोहोचला तरीही महाजन यांनी कामकाज तहकूब करण्यास नकार दिला आणि कामकाज सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. सदस्यांचे कृत्य ही लोकशाहीची हत्या आहे, ही लोकशाही नाही, ४४० सदस्यांना कामकाजात सहभागी व्हावयाचे आहे आणि केवळ ४०-५० सदस्य त्यांना बोलू देत नाहीत. त्यामुळे ते किती बेजबाबदार आहेत ते जनतेला कळू द्या. अध्यक्षांना टीव्हीवर झळकण्याची इच्छा नाही. जनतेला पाहू द्या, सभागृहात काय चालले आहे ते, असे महाजन म्हणाल्या.
त्यापूर्वी काँग्रेसच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या आसनाजवळ फलक फडकविले. त्यावरून संसदीय कामकाजमंत्री नायडू यांनी काँग्रेसवर हल्ला चढविला. सभागृहात काय चालले आहे, २० सदस्य संपूर्ण सभागृहावर हुकूमत गाजवू शकत नाही, त्यांच्यावर कारवाई करावी, हा कोणत्या प्रकारचा तमाशा आहे, अध्यक्षांच्या दालनात जाऊन निदर्शने केली आणि आता ते अध्यक्षांच्या चेहऱ्यासमोर फलक फडकवीत आहेत, असे नायडू म्हणाले. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनीही गृहमंत्री राजनाथसिंह यांच्याशी चर्चा करताना याबाबत चिंता व्यक्त केली. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे आणि शिवराजसिंह चौहान यांच्यावर कारवाई होईपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू न देण्याचा निर्धार काँग्रेसने केला आहे.
नायडू यांनी मत व्यक्त करताच सुमित्रा महाजन म्हणाल्या की, गोंधळी सदस्यांचे वर्तन टीव्हीवर दाखविण्याचा आदेश दिला. सभागृहाचे कामकाज आपण स्थगित करणार नाही, सदस्यांचे वर्तन कसे आहे ते जनतेला कळू द्या, संपूर्ण देशाला पाहू दे, केवळ ४० सदस्य ४४० सदस्यांच्या अधिकारांचे अपहरण करीत आहेत.