उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचे ‘शक्तिविधान’ जाहीर

उत्तर प्रदेशात काँग्रेसचे सरकार आल्यास २० लाख नव्या नोकऱ्यांचे आश्वासन काँग्रेसने दिले असून, त्यापैकी ४० टक्के नोकऱ्या या महिलांना दिल्या जातील, असे पक्षाने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या महिलाविषयक जाहीरनाम्यात म्हटले आहे. या निवडणूक जाहीरनाम्याचे प्रकाशन पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी येथे केले.

काँग्रेसच्या या महिला जाहीरनाम्याचे नाव शक्तिविधान असे असून तो सहा कलमी आहे. काँग्रेसने राज्यात सत्ता स्थापन केली तर, राज्यातील ५० टक्के शिधावाटप दुकाने ही महिलांच्या व्यवस्थापनाखाली आणि त्यांच्या करवीच चालविली जातील, असेही या वेळी प्रियंका यांनी जाहीर केले.

या जाहीरनाम्यात स्वाभिमान, स्वावलंबन, शिक्षण, सन्मान, सुरक्षा आणि आरोग्य अशी सहा कलमे आहेत.

महिलांसाठी नोकऱ्यांत ४० टक्के जागा राखून ठेवताना सध्याच्याच आरक्षणविषयक धोरणाचा अवलंब केला जाईल, असेही प्रियंका गांधी यांनी या वेळी स्पष्ट केले.

येथील काँग्रेस भवनात पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, घर कामगारांना कामाच्या ठिकाणी पुरेशा मानवी सुविधा मिळतील, हे पाहण्यासाठी कामगार खात्यात वेगळा विभाग स्थापन केला जाईल.

आदित्यनाथ यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही -प्रियंका

आपल्या धर्माविषयी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही, असे काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे. पक्षाच्या सरचिटणीस असलेल्या प्रियंका यांच्या हस्ते मंगळवारी पक्षाच्या महिलाविषयक जाहीरनाम्याचे प्रकाशन झाले. शक्तिविधान असे या जाहीरनाम्याचे नाव आहे. त्या वेळी प्रियंका यांना याविषयी पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर गांधी म्हणाल्या की, ‘‘मी कोणत्या मंदिरात जाते, कधीपासून जाते, ते योगी यांना माहीत आहे काय? मी १४ वर्षांची असल्यापासून उपवास करते, हे त्यांना माहीत आहे काय? ते माझ्या धर्माविषयी, श्रद्धास्थानांविषयी प्रमाणपत्र देणार काय? मला त्यांच्या अशा प्रमाणपत्राची गरज नाही.’’ आदित्यनाथ यांनी गेल्या महिन्यात म्हटले होते की, भाजपने उत्तर प्रदेशात पुन्हा सरकार स्थापन केले तर, विरोधी पक्षाचे सर्व नेते मंदिराबाहेर कारसेवा करताना पाहायला मिळतील.