गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेत नाराज असलेले नेते एकनाथ शिंदे यांनी विधान परिषद निवडणुकीनंतर समर्थक आमदारांसह गुजरातमधील सूरतची वाट धरत बंड पुकारल्याने शिवसेनेत उभी फूट पडली आहे. महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजपाबरोबर युती करण्याची अट शिंदे यांनी घातल्याने त्यांच्या परतीचे दोर कापले गेल्याचे संकेत आहेत. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार संकटात आले आहे. अशातच एकनाथ शिंदे यांच्यासहीत ३३ आमदार सुरतमधून विमानाने आसामच्या गुवाहाटीमध्ये पोहोचले आहेत. यानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना आपल्यासोबत ४० आमदार असल्याचा दावा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“शिवसेनेचे ४० आमदार माझ्यासोबत आहेत. आम्ही सर्व जण बाळासाहेबांचे हिंदुत्व आणि भूमिका पुढे घेऊन जाणार आहोत. मला कोणावर टीका करायची नाही. इथे शिवसेनेचे आमदार आहेत आणि आम्हाला बाळासाहेबांचे हिंदुत्व पुढे घेऊन जायचे आहे. माझ्यासोबत ४० आमदार इथे आले आहेत आणि आणखी १० येणार आहेत,” असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

“शिवसेनेने कुठलेही बंड केलेले नाही. शिवसेना आमदारांनी कुठल्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. बाळासाहेबांचे आणि हिंदुत्वाचे विचार यापासून शिवसेना आमदार कधीही फारकत घेणार नाहीत. मुख्यमंत्र्यांशी माझी चर्चा झालेली आहे. बाळासाहेबांचा नारा हा बुलंद केला जाईल. बाळासाहेबांचे हिंदुत्व आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत,” अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी सुरत येथून निघताना दिली होती.

दरम्यान, राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचा दुसरा उमेदवार पराभूत झाल्यानंतर विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेची मते फुटण्याची आणि राज्य सरकार अस्थिर होण्याची चिन्हे दिसू लागली होती. विधान परिषद निवडणुकीत तसेच घडल़े  शिवसेनेबरोबरच काँग्रेसची मते फुटली आणि भाजपला पहिल्या पसंतीची १३४ मते मिळाली. भाजपच्या विजयानंतर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही राज्यातील बदलत्या समीकरणांची नांदी असल्याचे विधान केले होते. त्यानंतर रात्रीत हालचाली झाल्या आणि एकनाथ शिंदे हे काही समर्थक आमदारांसह सूरतकडे रवाना झाले. गुजरात भाजपचे अध्यक्ष व खासदार सी. आर. पाटील यांच्या देखरेखीखाली आणि कडक पोलीस बंदोबस्तात ‘ला मेरिडियन’ या हॉटेलात शिंदे यांनी समर्थक आमदारांसह मुक्काम ठोकला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 40 shivsena mlas with me eknath shinde claims to have reached guwahati abn
First published on: 22-06-2022 at 08:03 IST