थायलंडमधील कारवाई

पोकेमॉन गो खेळणाऱ्या मोटार चालकांवर थायलंड पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून ४२ जणांना गाडी चालवत असताना गेम खेळल्याने अटक केली आहे. अतिरिक्त महानगर पोलिस प्रमुख सनित महाथावोर्न यांनी सांगितले, की पोकेमॉन ट्रॅफिक नो गो मोहिमेत वाहनचालकांना ८०० ते दोन हजार रूपये दंड करण्यात आला. त्यांनी वाहन चालवताना मोबाईलचा वापर करून रस्ते वाहतूक कायद्याचे उल्लंघन केले आहे. मोटरचालकांना अटक करण्यापूर्वी पोलीस अधिकारी एकमेकांच्या समन्वयात होते. मोटरचालक ट्रॅफिक सिग्नलची वाट पाहात असताना मोटारी बंद अवस्थेत असल्या तरी त्या स्थितीत मोबाईलवर पोकेमॉन गो खेळणे बेकादेशीर आहे. पोके मॉन पकडण्यासाठी मोटारीत असताना मोबाईल वापरणे हे अपघातास कारण ठरू शकते.

ही मोहीम सोमवारी सुरू केली असून बँकॉकमधील १० प्रमुख रस्त्यांवर राबवली जात आहे. बँकॉकमध्ये ज्या रस्त्यांवर वाहतूक खूप मोठय़ा प्रमाणात असते तेथे अपघात टाळण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे. पोकेमॉन गो खेळापासून त्यासाठी लोकांना परावृत्त करणे आवश्यक आहे असे पोलिसांनी सांगितले.

 

नॉर्वेच्या अध्यक्षांनी पोकेमॉन खेळण्याचा आनंद लुटला

ऑस्लो : गेम्सची आवड असलेल्या नॉर्वेच्या पंतप्रधान एरना सोलबर्ग यांनी अधिकृत कामातून मिळालेल्या मोकळ्या वेळात ब्रॅटिस्लाव्हा येथे या आठवडय़ात पोकेमॉन शोधण्याच्या खेळाचा आनंद लुटला. त्यांच्या समवेत अंगरक्षक, अधिकारी, दूरचित्रवाणी चमू असे सर्व जण होते. सोमवारी त्यांना दोन बैठकांमध्ये मोकळा वेळ मिळाला असता त्यांनी स्मार्टफोनवर नजर स्थिर केली व पोकेमॉन शोधण्यात रममाण झाल्या, दूरचित्रवाणीवर त्याची दृश्ये दाखवण्यात आली. दुर्मीळ पोकेमॉनवर हात अजमावण्याची आपली इच्छा आहे, असे त्यांनी सांगितले पण त्यासाठी १० कि.मी. चालावे लागते. मोफत पोकेमॉन गो अ‍ॅपमध्ये ग्राफिक्स, स्थाननिश्चिती व कॅमेरा क्षमता यांचा वापर केला जातो.

यापूर्वी सोलबर्ग यांनी कँडी क्रशवरील प्रेम असेच जगजाहीर दाखवले होते. माझ्या बहिणीला व्हरांडय़ात पोकेमॉन सापडला, असे त्यांनी एका वृत्तपत्राला सांगितले.