Mahatma Gandhi Statue Melbourne : मेलबर्नमधील रोव्हिल येथे महात्मा गांधींच्या पुतळ्याची मंगळवारी विटंबना करण्यात आली. येथील पुतळाच चोरीला गेल्याचं समोर आलं आहे. हे प्रकरण भारतात समजताच परराष्ट्र मंत्रालयाने जबाबदार असलेल्यांवर त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. हिंदूस्तान टाइम्सने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
“मेलबर्नमधील रोव्हिल येथील ऑस्ट्रेलियन इंडियन कम्युनिटी सेंटरमध्ये असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याची अज्ञात लोकांनी केलेल्या तोडफोडीचा आम्ही तीव्र निषेध करतो”, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी माध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. जयस्वाल म्हणाले की, भारताने “ऑस्ट्रेलियन अधिकाऱ्यांकडे हा मुद्दा जोरदारपणे उपस्थित केला आहे”, त्यांनी पुतळा परत मिळवण्यासाठी त्वरित कारवाई करावी आणि दोषींना जबाबदार धरावे अशी विनंती केली आहे.
४२६ किलो वजनाचा महात्मा गांधींचा पुतळा चोरीला गेला
मेलबर्नमधील रोव्हिल येथील ऑस्ट्रेलियन इंडियन कम्युनिटी सेंटरच्या बाहेर बसवण्यात आलेला महात्मा गांधींचा कांस्य पुतळा १२ जानेवारी रोजी पहाटे चोरीला गेला, असे ऑस्ट्रेलिया टुडेने वृत्त दिले आहे. ४२६ किलो वजनाचा हा पुतळा नवी दिल्ली येथील इंडियन कल्चरल रिलेशन्स कौन्सिल (ICCR) कडून भेट म्हणून देण्यात आला होता, ज्याचे उद्घाटन २०२१ मध्ये ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी केले होते. ऑस्ट्रेलिया टुडेच्या वृत्तानुसार, व्हिक्टोरिया पोलिसांच्या नॉक्स क्राइम इन्व्हेस्टिगेशन युनिटने चोरीचा तपास सुरू केला आहे, ज्यामुळे मेलबर्नच्या भारतीय-ऑस्ट्रेलियन समुदायात पुन्हा चिंता निर्माण झाली आहे.
ऑस्ट्रेलिया टुडेला दिलेल्या निवेदनात पोलिसांनी म्हटले आहे की, रोव्हिलमधील किंग्सले क्लोज येथील चॅरिटी परिसरातून तीन अज्ञात व्यक्तींनी ही मूर्ती रात्री १२.५० वाजता चोरली. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याने, पोलिसांनी भंगार धातू विक्रेत्यांना कांस्य पुतळा विकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे आणि कोणत्याही संशयास्पद हालचालीची त्वरित तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.

