न्यूयॉर्क : अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्याला इडा चक्रीवादळाने मोठा तडाखा दिला असून नद्यानाले भरून वाहू लागल्याने पुरात बळी पडलेल्यांची संख्या ४५ झाली आहे.

इडा या चक्रीवादळाने घडवलेल्या विध्वंसाचे खरे दर्शन गुरुवारी झाले. या भागात विक्रमी पाऊस झाला असून घरे व मोटारीतील किमान चाळीस जण बुडाले.  मेरीलँड ते कनेक्टीकट या भागात बुधवारी रात्री वादळाने थैमान घातले. गुरुवारीही ते चालूच राहिले. न्यूजर्सीमध्ये किमान २३ जण मरण पावले असून डेमोक्रॅटिक पक्षाचे गव्हर्नर फिल मर्फा यांनी हानीची ही माहिती दिली. न्यूयॉर्क शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तेथे किमान १३ जण मरण पावले असून त्यातील ११ जण  कमी उंचीच्या अपार्टमेंटमध्ये पाणी घुसल्याने मरण पावले.

अध्यक्ष जो बायडेन यांनी  रहिवाशांना मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. न्यूयॉर्कच्या महामार्गावर पाचशे वाहने वाहून आलेली दिसली. रस्त्यांवर कचरा व मातीचा डोंगर झाला होता. काही बोगद्यांमध्ये १७ रेल्वेगाड्या अडकून पडल्या होत्या.