दशकातील सर्वाधिक भीषण हल्ले

बांगलादेशात हिंदूविरोर्धी हिंसाचाराच्या अनेक घटना झाल्या असून त्या प्रकरणांत ४५० जणांना अटक करण्यात आल्याचे बांगलादेशच्या पोलिसांनी म्हटले आहे.

गेल्या संपूर्ण दशकात हिंदूंच्या विरोधात इतका भीषण हिंसाचार कधी झाला नव्हता. पोलिसांनी संतप्त जमावाला काबूत आणण्याचा प्रयत्न केला पण तरी सहा जण ठार झाले. आग्नेयेकडील नोआखाली जिल्ह्यात मुस्लिमांच्या कुराण या धर्मग्रंथांची विटंबना केल्याच्या कथित घटनेमुळे मुस्लिमांनी शेकडोंच्या संख्येने निदर्शने केली होती. त्यानंतर अनेक हिंदू मंदिरांची मोडतोड करून घरांवर हल्ले करण्यात आले होते. आतापर्यंत या प्रकरणी ७१ गुन्हे दाखल करण्यात आले असून दुर्गा पूजेच्या वेळी हा हिंसाचार झाला, असे बांगलादेशच्या पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले.

आतापर्यंत साडेचारशे संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. बांगलादेशात जातीय तणाव वाढला असून बांगलादेशी राज्यघटनेनुसार मुस्लिम हा मुख्यधर्म आहे पण धर्मनिरपेक्षतेचे तत्त्वही मान्य करण्यात आले आहे.

पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाच्या २००९ पासूनच्या काळातील हा सर्वात  भीषण हिंसाचार असून समाजमाध्यमांमुळे हिंदूंविरोधातील हिंसाचार आणखी भडकला, असे  संयुक्त राष्ट्रांचे निवासी समन्वयक मिया सेपो यांनी म्हटले आहे.

अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलने या सगळ्या प्रकाराची चौकशी करून संबंधितांना शिक्षा करण्याची मागणी केली आहे.