बनावट चकमकीप्रकरणी २५ वर्षांनंतर निकाल
उत्तर प्रदेशातील पिलीभित येथे २५ वर्षांपूर्वी एका खोटय़ा चकमकीत १० शीख यात्रेकरूंना ठार मारल्याच्या प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने सोमवारी ४७ पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
विशेष न्यायाधीश लल्लूसिंग यादव यांनी १ एप्रिलला या पोलीस कर्मचाऱ्यांना ‘बनावट चकमक’ घडवून आणल्याबद्दल दोषी ठरवले होते.
सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, १२ जुलै १९९१ रोजी पोलिसांनी शीख यात्रेकरूंना घेऊन पिलीभितला जाणारी खासगी बस कचलापूल घाटात अडवली आणि त्यातील ११ जणांना बळजबरीने खाली उतरवले. त्यांना वेगवेगळ्या गटांत विभागून एका जंगलाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये नेण्यात आले. त्या ठिकाणी ३ चकमकींमध्ये पोलिसांनी त्यांचा ‘थंड डोक्याने’ खून केला. सर्व मृतदेहांची उत्तरीय तपासणी करून पोलिसांनी त्याच दिवशी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.
आपण १० खलिस्तानी अतिरेक्यांना ठार मारल्याचा दावा पोलिसांनी दुसऱ्या दिवशी केला. बसमधील शिखांपैकी काहीजणांविरुद्ध फौजदारी गुन्हे होते आणि त्यांच्याकडे शस्त्रे होती असाही त्यांचा दावा होता.
राज्याच्या तराई भागात अतिरेक्यांशी संबंधित घटनांमध्ये वाढ झाली असतानाच हा प्रकार घडला होता.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून सीबीआयने या प्रकरणाचा तपास केला.
‘दहशतवाद्यांना’ मारल्याबद्दल बक्षीस आणि ख्याती मिळवणे हा या हत्यांमागील उद्देश होता, असे त्यांना आढळले.या प्रकरणी ५७ पोलिसांवर आरोप ठेवण्यात आले होते, मात्र खटला सुरू असण्याच्या काळात यापैकी दहाजण मरण पावले.