उत्तर प्रदेशातील लखनऊ आणि सीतापूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये रात्री उशिरा भूकंपाचे धक्के जाणवले. मध्यरात्री १.१६ च्या सुमारास जाणवलेल्या या भूकंपाची तीव्रता ५.२ रिश्टर स्केल इतकी होती. त्याचा केंद्रबिंदू लखनऊच्या १३९ किमी उत्तर-ईशान्य भागात ८२ किमी खोलीवर होता.

सुदैवाने जीवितहानी नाही

सुदैवाने अद्याप कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. भूकंपाच्या धक्क्यामुळे झोपेत असलेले नागरिक खडबडून जागे झाले आणि त्यांनी घराबाहेर पळ काढला. शहरात गोकुळाष्टमीचा उत्सव उत्साह साजरा करण्यात येत होता. भूकंपाचे धक्के बसताच भाविक मंडपामधून बाहेर पळत रस्त्यावर येऊन उभे राहिले. नागरिकांच्या म्हणण्यानुसार हे धक्के एवढे जोरात होते की, घरातील फ्रिजसह अनेक वस्तू जोरजोरात हलत होत्या.

सीतापूरमध्येही भूकंपाचे धक्के

मध्यरात्री १.१६ च्या सुमारास सीतापूरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतेचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी लखनऊसह सीतापूरमधील नागरिकही रात्री उशिरापर्यंत जागे होते.

उत्तराखंडमध्येही सौम्य भूकंपाचे धक्के

याआधी उत्तराखंडच्या पिथौरागढ भागातही ३.६ तीव्रतेच्या भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. जम्मू आणि काश्मीरमधील हेनले गावाच्या दक्षिण-नैऋत्येस ३.१ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची माहिती मिळाली आहे.